मुंबई : 16 मार्च 2024 | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने 2022 मध्ये तिला मायोसिटीस हा ऑटोइम्युन आजार असल्याचा खुलासा केला होता. उपचारादरम्यानच तिचा ‘यशोदा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी समंथा असमर्थ होती. त्यामुळे तिने आजारपणाचा खुलासा करावा, असं टीमकडून सांगण्यात आलं होतं. मायोसिटीसमुळे ‘यशोदा’चं प्रमोशन करू शकणार नाही असं स्पष्ट केल्यास लोक तुला समजून घेतील, असं तिला म्हटलं गेलं होतं. त्यामुळे समंथाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला होता.
आता ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह 2024’मध्ये समंथाने खुलासा केला की त्यावेळी मुलाखती देणं तिच्यासाठी खूपच अवघड होतं. मात्र लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून त्यावेळी मुलाखती देऊन सर्वकाही स्पष्ट केल्याचं समंथाने सांगितलं. “मला माझ्या आजारपणाचा खुलासा करण्यासाठी भाग पाडलं होतं. त्यावेळी माझी मुख्य भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेत होता. माझी प्रकृती इतकी वाईट होती की मी प्रमोशन करण्याच्या स्थितीत नव्हते. माझ्याबद्दल बऱ्याच गैरसमजुती आणि चुकीची माहिती पसरवली जात होती. मी चित्रपटाचं प्रमोशन न केल्यास तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होईल असं निर्मात्यांना वाटत होतं”, असं ती म्हणाली.
याविषयी समंथाने पुढे सांगितलं, “म्हणून मी एक मुलाखत देण्यास तयार झाले. अर्थातच आजारपणात असल्याने मी पूर्वीसारखी दिसत नव्हते. मी स्थिर राहावी यासाठी मला औषधांचे अधिक डोस देण्यास आले होते. मला हे सर्व करण्यासाठी भाग पाडलं होतं. म्हणूनच मी त्यातून माघार न घेता आजारपणाचा खुलासा केला.” आजारपणाविषयी प्रामाणिकपणे व्यक्त झाल्यानंतरही लोकांच्या नकारात्मक टिप्पण्यांचा सामना तिला करावा लागला होता. मात्र यामुळे अधिक कठोर बनल्याचं समंथाने सांगितलं.
“मला लोकांनी सिंपथी क्वीन (सहानुभूतीची क्वीन) म्हटलं. एक अभिनेत्री आणि एक माणूस म्हणून मी माझ्यात बरेच सकारात्मक बदल करत गेले. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी सतत तणावात आणि चिंतेत असायचे. ऑनलाइन लोकांनी माझ्याबद्दल काय लिहिलंय ते वाचत बसायचे. लोक जितकं माझ्यावर आरोप करू लागले, तितकंच मी माझ्या प्रत्येक विचारावर प्रश्न उपस्थित करू लागले. त्यांनीच मला अशी व्यक्ती बनण्यास भाग पाडलं, जिचा मला अभिमान वाटेल”, अशा शब्दांत समंथा व्यक्त झाली.