मुंबई: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू मायोसिटीस या ऑटो-इम्युन आजाराचा सामना करतेय. काही दिवसांपूर्वी तिने अमेरिकेत जाऊन त्यावर उपचार घेतला होता. मात्र तब्येतीत अपेक्षित सुधारणा नसल्याने ती पुन्हा दुसऱ्या देशात उपचारासाठी जाणार असल्याचं कळतंय. मायोसिटीसवरील अद्ययावत उपचारासाठी समंथा दक्षिण कोरियाला जाणार असल्याचं समजतंय. मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात.
समंथाचे आईवडील तिला दक्षिण कोरियामध्ये आयुर्वेदीक उपचारासाठी घेणार जाणार आहेत. तिथे ती काही दिवस राहणार आहे. समंथाचा ‘यशोदा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी समंथाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मायोसिटीसने ग्रस्त असल्याची माहिती दिली होती.
अमेरिकेत उपचार घेऊन परतल्यानंतर समंथा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात परतली. मात्र भारतात परतल्यानंतर तिची प्रकृती पुन्हा बिघडू लागल्याने तिला हैदराबादमधल्या रुग्णालयातही दाखल केलं होतं. आता पुढील उपचारासाठी ती काही दिवस दक्षिण कोरियाला जाणार असल्याचं कळतंय.
‘काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाच्या आजाराचं निदान झालं. आजारातून बरी झाल्यानंतर मी तुम्हाला याविषयीची माहिती देणार होते. मात्र बरं होण्यास मला अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ लागतोय. मी लवकरच पूर्ण बरी होईन असा डॉक्टरांना विश्वास आहे. माझ्या आयुष्यात मी चांगले दिवस पाहिले.. वाईटही पाहिले.. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या. यातील आणखी एक दिवस मी आता हाताळू शकत नाही, असं वाटत असतानाच तो क्षण कसा तरी निघून जातो. मी लवकरच बरी होईन असा मला विश्वास आहे. ही वेळसुद्धा निघून जाईल’, अशी पोस्ट समंथाने लिहिली होती.