“थर्डक्लास डायलॉगवर..”; शाहरुखच्या ‘जवान’मधील डायलॉगवर समीर वानखेडेंचं उत्तर

| Updated on: Dec 18, 2024 | 11:07 AM

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर 'जवान'मधील शाहरुख खानचा एक डायलॉग तुफान चर्चेत आला होता. 'बेटे को हाथ लगाने से पहले..' असा हा डायलॉग होता. हा डायलॉग समीर वानखेडेंना उद्देशून होता, अशी चर्चा होती. त्यावर आता वानखेडेंनी मौन सोडलं आहे.

थर्डक्लास डायलॉगवर..; शाहरुखच्या जवानमधील डायलॉगवर समीर वानखेडेंचं उत्तर
Sameer Wankhede and Shah Rukh Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्यातील एका डायलॉगने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ‘बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर’ हा डायलॉग त्यावेळी तुफान चर्चेत होता. शाहरुखने या डायलॉगद्वारे नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरोचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडेंना टोला लगावल्याचं म्हटलं जात होतं. समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. 2021 मध्ये एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करत या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केली जात असल्याचा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. या छापेमारीत शाहरुख खानचा मुलगा आर्यनलाही अटक झाली होती. त्यावेळी समीर वानखेडे हेच मुंबई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक होते. आर्यन खान याप्रकरणी जवळपास महिनाभर तुरुंगात होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. आर्यनच्या सुटकेनंतर ‘जवान’ प्रदर्शित झाला आणि या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘जवान’मधील डायलॉग विशेष चर्चेत आला होता. आता समीर वानखेडे यांनी या डायलॉगवर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समीर वानखेडे यांना शाहरुखच्या त्या डायलॉगविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी या डायलॉगला ‘फालतू’ असं म्हटलंय. ‘द गौरव ठाकूर शो’मध्ये समीर वानखेडे म्हणाले, “हे पहा, मी कोणाचंही नाव घेऊन कोणालाही प्रसिद्धी देऊ इच्छित नाही. जे चॅट्स लीक झाले होते, ते हायकोर्टासमोर आहेत. त्यामुळे त्यावर मी टिप्पणी देऊ इच्छित नाही आणि हा जो डायलॉग आहे, जो तुम्ही आता म्हणून दाखवलात.. त्यावर बोलायचं झाल्यास मी चित्रपट फारसे पाहत नाही. हे जे शब्द आहेत.. ‘बाप’, ‘बेटा’ हे मला खूपच फालतू आणि थर्ड-रेड शब्द वाटतात.”

“आपल्या भारतीय संस्कृतीत असे शब्द वापरले जात नाही. ही रोड-साइड भाषा आहे आणि त्या पातळीवर उतरून मी अशा रोड-साइड डायलॉगवर उत्तर देणं अशी माझी स्वत:कडून अपेक्षा नाही”, असं ते पुढे म्हणाले. विशेष म्हणजे चित्रपटाच्या मूळ स्क्रिप्टमध्ये हा डायलॉग नव्हताच असा खुलासा ‘जवान’चे संवादलेखक सुमीत अरोरा यांनी केला होता.

हे सुद्धा वाचा

“हा डायलॉग मूळ ड्राफ्टमध्ये नव्हता. शाहरुख सरांच्या भूमिकेची एण्ट्री कोणत्याच डायलॉगशिवाय होती. मात्र शूटिंगदरम्यान असं वाटलं की त्या भूमिकेला एखादा तरी डायलॉग दिला पाहिजे होता. मी तिथे सेटवरच होतो आणि मला पटकन तिथे बोलावलं गेलं. त्यावेळी माझ्या तोंडून हाच डायलॉग निघाला की, बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर. त्या क्षणी त्या सीनला हाच डायलॉग योग्य वाटेल असं मला जाणवलं. दिग्दर्शक अटली आणि शाहरुख सरांनाही हा डायलॉग आवडला. म्हणूनच त्यांनी तो सीनमध्ये त्यावेळी समाविष्ट केला”, असं अरोरा यांनी सांगितलं होतं.