बॉलिवूडमधल्या कलाकारांच्या वाढत्या मानधनावरून बरीच चर्चा होताना दिसते. काही कलाकार अव्वाच्या सव्वा फी मागतात, अशी टीका निर्माते-दिग्दर्शकांकडून करण्यात आली होती. बॉलिवूड चित्रपटांमधून चांगली कमाई होत नसताना कलाकार वाढून-चढवून फी मागतात, अशी तक्रार करण जोहर आणि फराह खान यांनी बोलून दाखवली होती. यावरून आता अभिनेता समीर सोनीने चांगलंच फटकारलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समीर या मुद्द्यावर मोकळेपणे व्यक्त झाला.
“मला करण आणि फराह यांना इतकंच सांगायचं आहे, जर तुम्हाला असं वाटतंय की खर्च वाढतोय, तर तुम्हीच त्या सगळ्यासाठी पैसे देत आहेत. तुम्ही 100 कोटी रुपयांना एखादा मोठा स्टार घेऊन असं बोलू शकत नाही की तो जास्त फी मागतोय. काही कमतरता तुमच्यातही आहे. कारण इथे एक कोटी आणि 50 लाख रुपयांमध्येही काम करणारे कलाकार आहेतच. तुम्हीच याची सुरुवात केली”, अशा शब्दांत समीरने करण आणि फराहला फटकारलं आहे.
चित्रपटाची कमाई फारशी झाली नाही तरी बॉलिवूडमधील स्टार भरभक्कम मानधन मागतात, असं करणने एका मुलाखतीत म्हटलं होतं. फराह खानने तर थेट याला ‘संसाधनांचा अपव्यय’ असं म्हटलं होतं. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या एका रिपोर्टमध्ये चित्रपटाच्या निर्मितीच्या खर्चावर प्रकाश टाकण्यात आला होता. प्रत्येक कलाकारानुसार त्याची फी वेगवेगळी असली तरी सर्वसाधारणपणे स्पॉटबॉयला एका दिवसाचे 25 हजार रुपये, खासगी सुरक्षेसाठी दरडोई 15 हजार रुपये आणि स्टायलिस्टचे एक लाख रुपये. एका स्टारच्या मागे एका दिवसाचा खर्च जवळपास 20 ते 22 लाख रुपये इतका येतो. तर एका चित्रपटाचं शूटिंग जवळपास 70 दिवसांपर्यंत चालतं. या हिशोबाने एका स्टारचा संपूर्ण चित्रपटासाठीचा खर्च 15 ते 20 कोटी रुपये इतका होतो.
समीर सोनीच्या आधी अभिनेता राजीव खंडेलवाल यानेसुद्धा करण जोहर आणि फराह खान यांच्या टिप्पणीवरून टीका केली होती. काही कलाकार 35 कोटी रुपये मानधन घेतात पण त्यांच्या चित्रपटाची ओपनिंग कमाई ही 3.5 कोटी रुपयेसुद्धा होता नाही, असं करण म्हणाला होता. त्यावर बोलताना राजीव सुनावलं, “कलाकाराला 35 कोटी रुपये मानधन द्यायला तुम्हाला कोणी सांगितलंय? जर 35 कोटी नसेल तर एखाद्याने त्यांना 30 कोटी रुपये तरी दिलेच असतील. त्याच्याआधी तुम्ही स्वत:च त्यांना 25 कोटी रुपये द्यायचे. जोपर्यंत हा आकडा 25 कोटींपर्यंत होता, तोपर्यंत तुम्हाला काहीच समस्या नव्हती. पण आता तुम्ही वाढलेल्या मानधनाविषयी बोलत आहात. त्यांना कोणी बिघडवलंय? तुम्हीच त्यांना राक्षस बनवलंय.”