अभिनेत्री सना खानने (Sana Khan) धर्माचं कारण देत अभिनयविश्व सोडलं होतं. ग्लॅमरच्या विश्वात यश मिळूनही मानसिक समाधान कधीच मिळालं नसल्याचं तिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलंय. सनाने सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. तर बिग बॉसच्या (Bigg Boss) सहाव्या सिझनमध्येही तिने भाग घेतला होता. 2020 मध्ये तिने मुफ्ती अनस सैय्यदशी (Mufti Anas Sayied) निकाह केला. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यात तिच्या लाईफस्टाईलविषयी आणि चित्रपटसृष्टी का सोडली याविषयी व्यक्त झाली. “माझ्याकडे नाव, प्रसिद्धी, पैसा हे सगळं होतं. मी काहीही करू शकले असते आणि मला हवं तसं राहू शकले असते. परंतु एक गोष्ट जी हरवली होती, ती म्हणजे मनाची शांती. माझ्याकडे सर्व काही असूनही मी आनंदी का नाही, असा प्रश्न मला पडायचा. मी नैराश्यात गेले होते,” असं तिने सांगितलं.
ज्या वर्षाने तिचं आयुष्य बदललं, त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला अजूनही आठवतंय की 2019 मध्ये रमजानमध्ये मला माझ्या स्वप्नात एकदा कबर दिसली. मला एक जळणारी, धगधगणारी कबर दिसली आणि मी स्वतःला त्यात पाहत होते. मला असं वाटलं की देव मला काहीतरी सांगू इच्छित आहे की जर मी बदलले नाही तर हा माझा शेवट असेल. त्यानंतर मला चिंता सतावू लागली. त्यावेळी माझ्यात झालेले बदल मला अजूनही आठवतात. मी सर्व इस्लामिक भाषणं ऐकत होते आणि एके रात्री मी खूप सुंदर काहीतरी वाचलं.”
“तुमचा शेवटचा दिवस हा हिजाब घालण्याचा तुमचा पहिला दिवस असावा असं तुम्हाला वाटत नाही, असं त्यात लिहिलं होतं. ती गोष्ट मला खूप खोलवर भिडली,” असं सांगत असतानाच सनाला अश्रू अनावर होतात. आयुष्यात आता नेहमीच हिजाब परिधान करण्याचं वचन देत ती पुढे म्हणाली, “दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली आणि तो माझा वाढदिवस होता. मी आधी खूप स्कार्फ विकत घेतले होते. मी टोपी आत ठेवली आणि स्कार्फ घातला आणि स्वतःला सांगितलं की मी हे पुन्हा कधीही काढणार नाही.”
पती अनस सय्यदसोबत ती नुकतीच हज यात्रेला गेली होती. एक बदललेली व्यक्ती म्हणून धार्मिक ठिकाणी गेल्याबद्दल आनंद व्यक्त करत सना म्हणाली, “मला आनंद आहे की आता मी बदलले आहे. मी पुन्हा कधीच माझा हिजाब काढणार नाही.” ‘धन धना धन गोल’मधील ‘बिल्लो रानी’सारख्या गाण्यांमुळेही सनाला प्रसिद्धी मिळवली. तिने ‘जय हो’, ‘वजह तुम हो’ आणि ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.