‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत, मात्र सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. टीव्ही अभिनेत्री सना मकबुल या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये सना तिच्या आजारपणाविषयी बोलताना भावूक झाली. आयुष्यात कधीही दारू न पिऊनसुद्धा नॉन अल्कोहोलिक हेपटायटिसचं निदान झाल्याचं तिने सांगितलं. याविषयी सांगताना सनाच्या डोळ्यात अश्रू होते. मद्यपान न करूनही यकृताच्या आजारपणामुळे त्रस्त झाल्याचं तिने सांगितलं आहे.
“मला नॉन अल्कोहोलिक हेपटायटिस हा यकृताचा आजार आहे. मी अशा लोकांपैकी एक आहे, जिने आयुष्यात कधीच दारूची चव चाखली नाही. पण तरीसुद्धा मला यकृताचा हा आजार झाला आहे. अनेकांना शेवटच्या स्टेजवर या आजाराचं निदान होतं. पण सुदैवाने माझ्या बाबतीत हे लवकर निदान झालं. 2021 मध्ये मला समजत नव्हतं की माझ्यासोबत काय होतंय. असेही काही दिवस होते, तेव्हा मी बेडवरूनही उठू शकत नव्हते”, असं सना म्हणाली. हे सांगताना तिला रडू कोसळलं.
‘एचटी लाइफस्टाइल’ला दिलेल्या मुलाखतीत झांड्रा हेल्थकेअरचे डायबेटोलॉजीचे प्रमुख आणि ‘रंग दे नीला’ उपक्रमाचे सहसंस्थापक डॉ. राजीव कोविल यांनी सांगितलं, “नॉन अल्कोहोलिक हेपटायटिसला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असंही म्हटलं जातं. यकृतामध्ये चरबी जमा झाल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. अर्थातच मद्यपानामुळे हा आजार उद्भवत नाही. तर त्यामागी वेगळी कारणं असू शकतात. ”
“नॉन अल्कोहोलिक हेपटायटिसची नेमकी कारणं अद्याप नीट समजलेली नाहीत. परंतु लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोधकता आणि चयापचय विकार यांसारख्या घटकांशी त्याचा संबंध असल्याचं मानलं जातं. टाइप 2 मधुमेह, उच्च कोलेस्टरॉल किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना नॉन अल्कोहोलिक हेपटायटिस होण्याचा धोका जास्त असतो”, असं त्यांनी सांगितलं.
सनाने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये ‘कितनी मोहब्बत है 2’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘आदत से मजबूर’ या मालिकांचा समावेश आहे. 2021 मध्ये ती ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर ती छोट्या पडद्यावर फारशी झळकली नाही.