मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट येत्या 14 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी इथं या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अख्खा महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढला असून रसिक प्रेक्षकांकडूनही या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. त्याचप्रमाणे अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे , श्रीकृष्ण शिंगणे यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? हे देशाला समजलंच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण तात्काळ जाहीर झालंच पाहिजे एवढंच आम्हाला समजतं.. असे अनेक मुद्दे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहेत. या चित्रपटाची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात रंगली आहे.
महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमतेअभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत 2016 मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील. आंदोलनं, उपोषणं करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त़्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे. अत्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.