मुंबई : 12 फेब्रुवारी 2024 | टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यानच शोएबने थेट दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर सानियाच्या कुटुंबीयांकडून तिने शोएबला ‘खुला’ दिल्याचं स्पष्ट केलं होतं. तेव्हापासून सानियाचं खासगी आयुष्य सतत चर्चेत आहे. आता सानियाच्या आईने तिच्या नातूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. या व्हिडीओमध्ये सानिया आणि शोएब यांचा मुलगा इजहान हा आजीसोबत खेळताना दिसून येत आहे.
घटस्फोटानंतर मुलगा इजहान हा सध्या सानियासोबतच आहे. सानियाच्या आईकडून त्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. आता नुकताच त्यांनी इजहानसोबत फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो आजीसोबत फुटबॉल खेळतोय. याआधी टेनिस खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी इजहानची काळजी घेण्याचं आवाहन सानियाच्या आईला केलंय.
एका पाकिस्तानी पत्रकाराने सानिया-शोएबच्या घटस्फोटाचा त्यांच्या मुलावर काय परिणाम होतोय, याबद्दलचं खळबळजनक वृत्त दिलं होतं. वडिलांच्या तिसऱ्या निकाहनंतर इजहान मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त असल्याचं त्याने सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर शाळेतील मित्रांकडून त्याला त्रास दिला जात असल्याचंही पत्रकाराने सांगितलं होतं. शाळेतील मित्र आणि इतर विद्यार्थी सतत इजहानला त्याच्या वडिलांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारत आहेत. यामुळे तो आणखी खचला आहे. या कारणामुळे इझानला शाळेत जाण्याची इच्छा नाही. मुलाखातर अखेर सानिया त्याच्यासोबत हैदराबादला परतल्याचंही या पत्रकाराने सांगितलं होतं. सानिया आणि शोएब हे घटस्फोटापूर्वी दुबईत राहत होते.
शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला. शोएबचा हा तिसरा तर सना जावेदचा हा दुसरा निकाह आहे. याआधी तिने गायक आणि अभिनेता उमैर जस्वालशी निकाह केला होता. सानिया मिर्झाची फसवणूक केल्याबद्दल भारत आणि पाकिस्तानातील असंख्य नेटकरी शोएबला ट्रोल केलं.