झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी फक्त सिनेमांमधून होणाऱ्या कमाईच्या आधारावर नसतात. त्यांचे इतर देखील अनेक व्यवसाय असतात. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरल्यानंतर सेलिब्रिटी त्यांचा मोर्चा व्यवसायाकडे वळवतात. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अनेकांचे हॉटेल आहेत, अनेक अभिनेत्री ब्यूटी प्रोडक्ट्स कंपनीच्या मालकीण आहे. तर अभिनेता संजय दत्त याच्या मात्र व्हिस्की ब्रँडची सर्वत्र धूम पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजूबाबाच्या व्हिस्की ब्रँडची चर्चा रंगील आहे.
संजय दत्तने द ग्लेनवॉक नावाचा स्कॉच व्हिस्की ब्रँड लॉन्च केला. कार्टेल आणि ब्रदर्सने लॉन्च केलेला हा ब्रँड आहे. संजय दत्तने गेल्या वर्षीच यामध्ये मोठी रक्कम गुंतवली होती. ज्याचा फायदा अभिनेत्याला होताना दिसत आहे. स्कॉच व्हिस्की ब्रँडमुळे संजूबाबा कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.
संजय दत्त याच्या स्कॉच व्हिस्की लॉन्च होऊन फार काळ झालेला नाही. पण मार्केटमध्ये स्कॉच व्हिस्कीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती मिळत आहे. संजूबाबाचं नाव असल्यामुळे लोकं देखील स्कॉच व्हिस्कीची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहेत.
द ग्लेनवॉकच्या एका वर्षाच्या कमाईबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, द ग्लेनवॉक स्कॉच व्हिस्कीच्या चार महिन्यात 1 लाख 20 हजार बाटल्यांची विक्री झाली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात द ग्लेनवॉक स्कॉच व्हिस्कीची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. कंपनीने चार महिन्यात 19.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पुढील आर्थिक वर्षापर्यंत 2.8 दशलक्ष बाटल्या विकण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. व्हिस्कीची कमाई अशीच सुरू राहिल्यास हे लक्ष्य गाठणे फारसे अवघड जाणार नाही. द ग्लेनवॉक व्हिस्कीच्या एका बाटलीच्या किंमतीबद्दल सांगायचं झालं तर, एका बाटलीची किंमत 1 हजार 550 रुपये ते 1 हजार 600 रुपये आहे. व्हिस्कीचे योग्य दर असल्यामुळे अनेक जण द ग्लेनवॉक व्हिस्कीची निवड करतात.
संजय दत्तच्या आधी ज्येष्ठ अभिनेते डॅनी डेन्झोंगपा यांनीही दारूच्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. त्यांची युक्सॉम ब्रुअरीज नावाची कंपनी आहे जी वेगवेगळ्या प्रकारची बिअर बनवते. ज्यातून डॅनी डेन्झोंगपा कोट्यवधींची कमाई करतात.
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने देखील दारूच्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. आर्यन खान याने भारतात वोडका ब्रँड लॉन्च केला आहे. एवढंच नाहीतर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनस याचा देखील ‘व्हिला वन’ नावाचा एक टकिला ब्रँड आहे.