मुंबई: अभिनेता संजय दत्तला 2020 मध्ये स्टेज 4 कॅन्सरचं निदान झालं होतं. संजय दत्तसोबतच त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. याआधी दिलेल्या काही मुलाखतींमध्ये तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने कॅन्सरवर मात करण्याचा प्रवास सांगितला. सुरुवातीला उपचार घेण्यास नकार दिल्याचा खुलासा त्याने या मुलाखतीत केला. बुधवारी संजय दत्त त्याची बहीण प्रिया दत्तसोबत एका रुग्णालयातील कार्यक्रमात पोहोचला होता. यावेळी तो कॅन्सरवर मात करण्याच्या प्रवासाविषयी व्यक्त झाला. ज्या डॉक्टरांनी संजयवर उपचार केले होते, ते सुद्धा त्याठिकाणी उपस्थित होते.
कॅन्सरविषयी पहिल्यांदा समजलं तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना संजय म्हणाला, “माझी कंबर सतत दुखायची. मी गरम पाण्याच्या बॉटलने त्यावर उपचार घेत होतो, पेन किलर्स घेत होतो. एके दिवशी मला श्वास घेताना अडचण निर्माण झाली. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण त्यावेळी मला कॅन्सरबद्दल पूर्ण माहिती देण्यात आली नव्हती. मी रुग्णालयात पूर्णपणे एकटा पडलो होतो.”
“माझी पत्नी, कुटुंबीय, बहीण यापैकी कोणीच माझ्यासोबत नव्हतं. मी एकटा होतो आणि अचानक एके दिवशी एका व्यक्तीने मला सांगितलं की मला कॅन्सर आहे. माझी पत्नी त्यावेळी दुबईत होती, त्यामुळे बहीण प्रिया माझ्याकडे आली. माझ्या कुटुंबात कॅन्सरची हिस्ट्रीच होती. माझ्या आईला पॅनक्रिॲटिक कॅन्सर होता. माझी पहिली पत्नी रिचा शर्मा हिचा ब्रेन कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्यामुळे सर्वांत आधी माझी प्रतिक्रिया अशीच होती की मी कीमोथेरेपी घेणार नाही. जर मरायचं असेल तर मी मरेन पण उपचार घेणार नाही”, असं त्याने पुढे सांगितलं.
संजय दत्तने सांगितलं की राकेश रोशन यांनी त्याला कॅन्सरच्या डॉक्टरांचा संपर्क क्रमांक दिला होता. अखेर त्या कठीण काळात कुटुंबीयांसाठी तो उपचार घेण्यास तयार झाला. “मी माझ्या कुटुंबीयांना खचून जाताना पाहिलंय आणि एके रात्री मी उपचार घेण्याचा निर्णय घेतला. कारण मी आजारी पडून खचलो तर तेसुद्धा खचणार. त्यामुळे मी कॅन्सरविरोधात लढण्याचा निर्णय घेतला”, असं तो पुढे म्हणाला.
संजयने यावेळी असंही सांगितलं की कॅन्सरवर मात करण्याच्या या प्रवासाविषयीची कोणतीच गोष्ट त्याने चाहत्यांपासून लपवली नाही किंवा कॅन्सरविषयी काही खोटं बोलला नाही. “लोकांना ही गोष्ट सार्वजनिक करायची नसते, काहींना त्याविषयी बोलायला आवडत नाही. मात्र मी करिअरची पर्वा न करता त्यावर मोकळेपणे बोलू लागलो. जेणेकरून गरजू लोकांची मी त्यातून मदत करू शकेन”, असं त्याने स्पष्ट केलं.