अभिनेते अनिल कपूर, संजय कपूर आणि निर्माते बोनी कपूर हे तिघं भावंडं गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. अनिल कपूर हे वयाची साठी ओलांडल्यानंतरही चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत आहेत. तर दुसरीकडे बोनी कपूर हेसुद्धा चांगल्या चित्रपटांची निर्मिती करत आहेत. मात्र या दोघा भावंडांच्या तुलनेत संजय कपूरचं करिअर फारसं यशस्वी ठरलं नाही. 1995 मध्ये भाऊ बोनी कपूर यांनीच त्यांच्या ‘प्रेम’ या चित्रपटातून संजयला बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजय त्याच्या करिअरबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. याच मुलाखतीत त्याने भावाविषयीची तक्रारही बोलून दाखवली. “माझ्या कठीण काळात भावाने मला भूमिकांची ऑफर दिली नव्हती आणि हा त्याच्या बिझनेसचा भाग असू शकतो, हे मी समजतो”, असं संजय म्हणाला.
“जेव्हा करिअरमध्ये माझा कठीण काळ सुरू होता, तेव्हा माझा भाऊ बोनी कपूरने मला भूमिकेची ऑफर दिली नव्हती. जेव्हा त्याने ‘नो एण्ट्री’ हा चित्रपट बनवला तेव्हा तो फरदीन खानच्याऐवजी मला त्या भूमिकेत घेऊ शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. अनिल कपूर आणि सलमान खान यांची निवड सर्वांत आधीच झाली होती. त्यामुळे तो चित्रपट तसाही हिट ठरणार होता. मला त्यात घेतलं असतं तरी तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला असता. गोष्टी ज्याप्रकारे घडल्या, त्याच प्रकारे घडल्या असत्या. फरदीनच्या ऐवजी मला घेतलं असतं तरी ‘नो एण्ट्री’ हा ब्लॉकबस्टर ठरला असता”, अशी खंत संजय कपूरने एका पॉडकास्टमध्ये व्यक्त केली.
“पण त्याने फरदीन खानला भूमिकेची ऑफर दिली, कारण त्यावेळी तो माझ्यापेक्षा जास्त चालणारा अभिनेता होता. गेल्या वीस वर्षांत मी माझ्या भावाच्या प्रॉडक्शनअंतर्गत काम केलं नाही. जेव्हा माझ्या आयुष्यातील कठीण काळ सुरू होते, तेव्हा त्यांचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं नाही. पण अखेर हा सगळा बिझनेसचा भाग झाला”, असं संजय पुढे म्हणाला.
केवळ संजय कपूरच नव्हे तर अनिल कपूर यांनीसुद्धा भाऊ बोनी कपूर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द बोनी यांनी याविषयीचा खुलासा केला होता. अनिल कपूर यांना ‘नो एण्ट्री’च्या सीक्वेलमध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र जेव्हा सीक्वेलच्या कलाकारांची नावं जाहीर झाली, तेव्हा त्यात त्यांचं नावंच नव्हतं. ही गोष्ट त्यांना बाहेरून समजली होती. त्यामुळे ते संतापले होते. ‘नो एण्ट्री’च्या सीक्वेलमधील कलाकारांची घोषणा झाल्यापासून भाऊ अनिल कपूर माझ्याशी बोलत नाहीये, असं बोनी कपूर यांनी सांगितलं होतं.