मुंबई | 21 जुलै 2023 : दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीला बुधवारी मध्यरात्री डोंगरसमाधी मिळाली. इरशाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या या वाडीवर दरड कोसळून 16 जणांचा झोपेतच अंत झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी इतर कामांची सूत्रे हातात घेतली. या सर्व घटनेवर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली. संकर्षण सहसा राजकीय नेत्यांवर भाष्य करत नाही, त्यामुळे त्याने लिहिलेल्या या पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं. मात्र पोस्टवर काही नकारात्मक कमेंट्स येण्यास सुरुवात होताच त्याने नंतर ती डिलिट केली.
‘मी कधीही राजकीय नेत्यांवर भाष्य करत नाही. त्या संदर्भात पोस्ट तर करतच नाही. कारण तो माझा प्रांत नाही. मला त्यातलं ज्ञान नाही. पण आज सोशल मीडियावर तीन वेगवेगळ्या पोस्ट पाहिल्या आणि खरंच छान वाटलं. 1- घटनास्थळी धावलेले, पुनर्वसनाचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री, 2- त्याच दुर्दैवी घटनांना आढावा घेणारे, नियोजन पाहणारे उपमुख्यमंत्री, 3- वंदे मातरम् विषयी संयमाने, योग्य शब्दात समज देणार उपमुख्यमंत्री. तिघेही वेगळ्या पक्षाचे.. पण बरं वाटलं की एकाच वेळी आमचं रक्षण, नियोजन आणि स्वाभिमान तिन्ही गोष्टींविषयी तळमळीने कुणीतरी काम करतंय. शेवटी तुम्हा आम्हाला काय हवं? तेच ना. खरं सांगू? आम्हाला तुम्ही सगळेच आवडता हो’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.
संकर्षणने ही पोस्ट लिहिताच त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. काहींनी त्याच्या या पोस्टचं कौतुक केलं तर काहींनी त्याला राजकीय विषयांवर भाष्य न करण्याचा सल्ला दिला. पोस्टवरील कमेंट्स वाढत असल्याचं पाहिल्यानंतर अखेर संकर्षणने ती पोस्टच डिलिट केली.
इरशाळवाडी दुर्घटनेची माहिती मिळताच लगेचच शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतकार्याचं नियोजन सुरू केलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी सकाळी लवकर डोंगर पायथ्याशी पोहोचून मदतकार्याची सारी सूत्रे स्वत: हाती घेतली होती. तसंच दुपारनंतर जवळपास दीड तास पायपीट करत ते डोंगरावर दुर्घटनास्थळी पोहोचले.