अभिनेत्री सारा अली खानला नुकतंच मुंबईतील जुहू परिसरात गरीबांना खाण्याचे पदार्थ वाटताना पाहिलं गेलं. त्यावेळी काही पापाराझींनी साराचा व्हिडीओ शूट करण्यास सुरूवात केली. जेव्हा साराच्या निदर्शनास ही गोष्ट आली तेव्हा तिने पापाराझींना व्हिडीओ शूट न करण्याची विनंती केली. “कृपया व्हिडीओ शूट करू नका. मी तुमच्याकडे विनंती करते”, असं ती म्हणते. मात्र तरीही पापाराझींनी साराचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. आता त्या व्हिडीओवर साराची आत्या सबा पतौडी यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. साराच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना सबाने म्हटलंय की तीसुद्धा दर शनिवारी गरीबांना मिठाई आणि खाण्याचे पदार्थ देते. मात्र हे करताना ती पापाराझींना बोलवत नाही. असं बोलून सबाने सारावर निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे.
साराचा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या व्हिडीओवर कमेंट करत सबाने लिहिलं, “मीसुद्धा दर शनिवारी हेच करते. मात्र तेव्हा मी पापाराझींना बोलवत नाही.” असं लिहून सबाने पुढे डोळा मारतानाचा इमोजी पोस्ट केला आहे. सबाने तिच्या या कमेंटद्वारे सारावर टीका केल्याचं म्हटलं जात आहे. जर सारा आणि तिच्या टीमने पापाराझींना त्याठिकाणी बोलावलं नसतं तर ते का गेले असते, असा सवाल काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला.
साराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिच्या परोपकारी वृत्तीची प्रशंसा केली. मात्र त्याचसोबत ती केवळ दिखावा करतेय, अशीही टीका काहींनी केली. ‘सारा प्रामाणिकपणे त्यांना खाद्यपदार्थांचं वाटप करतेय. तिच्या या परोपकारी कृत्याचा आदर करा,’ असं एकाने लिहिलंय. तर ‘सारा ही सर्वांत नम्र स्टारकिड आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. साराला अनेकदा विविध धर्माच्या धार्मिकस्थळांना भेट दिल्याचं पाहिलं गेलंय. सारा अजमेर शरीफलाही जाताना दिसते तर त्याचवेळी ती केदारनाथसमोरही नतमस्तक होते. मात्र यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं.
वडिलांचं आडनाव लावूनसुद्धा इस्लाम धर्माचं पालन करत नसल्याची टीका तिच्यावर झाली. एका कुटुंबात सारा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “माझ्या धार्मिक विश्वासांबद्दल प्रश्न विचारले जात असतील तर त्याचा मला त्रास होत नाही. कारण एक व्यक्ती म्हणून मी स्वत: कोण आहे हे मला कोणासमोरही सिद्ध करायची गरज नाही. आधी मी स्वत:ला इतरांसमोर कसं सादर करायचं, याविषयी फार विचार करायचे. मात्र ते करणं आता मी थांबवलं आहे”, असं सारा म्हणाली.