अभिनेत्री सारा अली खान सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ती ज्या व्यक्तीसोबत दिसतेय, ते पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. साराने तिच्या एक्स बॉयफ्रेंडशी पुन्हा पॅचअप केल्याच्या चर्चांना उधाण आलंय. इतकंच नव्हे तर भविष्यात सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघी एकमेकींच्या जाऊबाई-वहिनी बनणार असल्याच्याही कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये सारा ज्या मुलासोबतच नाचतेय, तो दुसरा तिसरा कोणी नसून राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि शिखर पहाडियाचा भाऊ वीर पहाडिया आहे. सारा आणि वीर एकमेकांना डेट करत होते. मात्र या दोघांचा ब्रेकअप झाला होता. तर अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या काही वर्षांपासून शिखरला डेट करतेय.
सारा आणि वीर हे दोघं एका बौद्ध मंदिरासमोर गढवाली गाण्यावर नाचताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या आगामी ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा असल्याचं म्हटलं जातंय. यावेळी साराने पांढऱ्या रंगाची फ्लोरस साडी नेसली आहे. तर वीरने सूट परिधान केला आहे. बॅकग्राऊंड डान्सर्ससोबत सारा आणि वीरने गढवाली गाण्यावर ठेका धरला आहे. ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी 24 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 1965 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान एअर वॉरच्या कथेची पार्श्वभूमी या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
वीर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याचा भाऊ शिखर पहाडिया अभिनेत्री जान्हवी कपूरला डेट करतोय. अनंत अंबानीच्या लग्नात वीर आणि शिखर हे दोघं भावंडं प्रकाशझोतात होते. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने हिंट दिली होती की जान्हवी आणि साराने दोन भावंडांना डेट केलंय. तेव्हापासूनच वीर आणि शिखर हे दोघं चर्चेत आहेत. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द सारा अली खानने वीरला डेट केल्याची कबुली दिली होती. “मी फक्त वीर पहाडियाला डेट केलंय. माझ्या आयुष्यात दुसरा कोणीच बॉयफ्रेंड नाही”, असं ती म्हणाली होती.