मुंबई : 21 मार्च 2024 | अभिनेत्री सारा अली खान लहान असतानाच तिची आई अमृता सिंग आणि वडील सैफ अली खान यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अमृतानेच सारा आणि इब्राहिम यांना लहानाचं मोठं केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सारा तिच्या आईविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सारा तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाविषयी याआधीही व्यक्त झाली होती. मात्र लहानाचं मोठं होत असताना आईबद्दलचे विचार कसे बदलले, याविषयी तिने सांगितलं. आपल्या आयुष्यात काही कमतरता आहे, असं सुरुवातीला साराला वाटायचं. मात्र नंतर तीच गोष्ट आशीर्वाद असल्याचं तिला जाणवलं.
‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत साराने सांगितलं की तिच्या आईला जेवण बनवता किंवा ड्राइव्ह करता येत नव्हतं. त्यामुळे आपली आई ही इतर मुलांच्या आईसारखी नाही असं तिला वाटू लागलं होतं. मात्र एकेदिवशी जेव्हा अमृताने साराला उत्तर दिलं, तेव्हा या गोष्टींकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोनच बदलला. सारा म्हणाली, “मी लहानाची मोठी होत असताना, मला माझी आई माझ्या इतर मित्रमैत्रिणींच्या आईपेक्षा खूप वेगळी वाटायची. तिला कार चालवता किंवा जेवण बनवता येत नव्हतं. त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं. अखेर एकेदिवशी आई मला म्हणाली, तुझ्या मित्रमैत्रिणींच्या किती आईवडिलांना अभिनय करता येतं, किती जणांना घोडदौड करता येते? कारण मला या गोष्टी जमतात. त्या दिवसानंतर मी तिला या गोष्टींवरून कधीच काही बोलले नाही.”
“आईने मला किंवा भाऊ इब्राहिमला कधीच कोणती कमतरता जाणवू दिली नाही. तिने आम्हाला उडण्यासाठी पंख दिले. त्याचसोबत तिने आम्हाला जमिनीशी बांधून ठेवलं, जेणेकरून आम्ही अति उंचसुद्धा उडू नये. आमच्यासाठी ती आमचा आरसा आहे. माझ्यासाठी ती माझी प्रेरणा आहे आणि तिने एकटीनेच सर्वकाही केलं. आज मला अनेक लोकांकडून मदत मिळते. पण माझ्या आईला त्यावेळी अशी मदत किंवा साथ मिळाली नव्हती. तरीसुद्धा तिने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं”, असं ती पुढे म्हणाली.
सारा नुकतीच ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटात झळकली. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तिचा ‘ऐ वतन मेरे वतन’ हा चित्रपटसुद्धा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय.