मुंबई : अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी ‘जरा हटके, जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. येत्या 2 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी तिने सहअभिनेता विकी कौशलसोबत उज्जैनमधल्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात शिवलिंगाचं दर्शन घेतलं. मात्र साराची ही शिवभक्ती काही नेटकऱ्यांना पसंत पडली नाही. म्हणून त्यांनी साराने इन्स्टाग्रामवर मंदिरातील फोटो पोस्ट करताच त्यावर कमेंट करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘तुझं संगोपन व्यवस्थित झालं नाही वाटतं, म्हणून तू मंदिरात हात जोडून बसली आहेस’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी साराला सुनावलं. त्यावर आता साराने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
इंदौर दौऱ्यावर असलेल्या साराला तिच्या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “मी माझं काम खूप गांभीर्याने करते. मी लोकांसाठी काम करते, तुमच्यासाठी करते. जर तुम्हाला माझं काम आवडलं नाही तर मला कदाचित वाईट वाटू शकेल पण माझी वैयक्तिक श्रद्धा ही माझी स्वत:ची आहे. मी त्याच भक्तीने अजमेर शरीफला जाईन ज्या श्रद्धेने मी बांगला साहेब गुरुद्वारा किंवा महाकालला जाते. अशा ठिकाणांना मी भेट देत जाईन. लोकांना जे बोलायचं ते बोलू द्या, मला त्याने फरक पडत नाही. तुम्हाला त्या जागेची ऊर्जा आवडणं गरजेचं असतं, मला त्या ऊर्जेवर विश्वास आहे.”
सारा आणि विकीने बुधवारी महाकालेश्वर मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा केली होती. यावेळी दोघांनी विधीवत पूजा करून भोलेनाथचा आशीर्वाद घेतला. महाकालेश्वरसोबत हात जोडून बसल्याचा फोटो साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या बाजूला विकीसुद्धा हात जोडून बसलेला दिसत आहे. ‘जय भोलेनाथ’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला. मात्र काही नेटकऱ्यांनी तिच्या शिवभक्तीवर प्रश्न उपस्थित केले आणि तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
‘तुझे वडील मुस्लिम आहेत आणि तू इथे मंदिरात पूजा करतेय’, असं एकाने म्हटलं. तर काहींनी थेट साराला तिचं नावं बदलण्याचा सल्ला दिला आहे. ‘तुझ्या अब्बूंनी तुला व्यवस्थित शिकवलं नाही वाटतं’, अशाही शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. या कमेंट्सनंतर साराच्या चाहत्यांनी तिची बाजू मांडली आहे. ‘साराची आई अमृता सिंग आणि वडील सैफ अली खान आहेत. त्यामुळे ती दोन्ही धर्म पाळू शकते’, असं एका चाहत्याने म्हटलंय. तर ‘देवाची प्रार्थना धर्माचा विचार करून केला जात नाही’, असं दुसऱ्याने लिहिलंय.