उज्जैन : अभिनेत्री सारा अली खान आणि विकी कौशल यांचा ‘जरा हटके, जरा बचके’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघं चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. विविध शहरांमध्ये जाऊन ते चाहत्यांची भेट आहेत, तर काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत ते डान्सचे व्हिडीओ शूट करत आहेत. अशातच सारा आणि विकीने देवदर्शनही करायचा निर्णय घेतला आहे. उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात जाऊन दोघांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. सारा आणि विकी भोलेनाथसमोर हात जोडून नतमस्तक झाले. मात्र साराची ही शिवभक्ती काही लोकांना पसंत पडली नाही. यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. तर साराच्या चाहत्यांनी तिची बाजू खंबीरपणे मांडत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
सारा आणि विकी यांचा नवीन चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या दोघांनी महाकालेश्वर मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा केली. सारा आणि विकीने विधीवत पूजा करून भोलेनाथचा आशीर्वाद घेतला. महाकालेश्वरसोबत हात जोडून बसल्याचा फोटो साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या बाजूला विकीसुद्धा हात जोडून बसलेला दिसत आहे. ‘जय भोलेनाथ’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला. मात्र काही नेटकऱ्यांनी तिच्या शिवभक्तीवर प्रश्न उपस्थित केले आणि तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
‘तुझं संगोपन व्यवस्थित झालं नाही वाटतं, म्हणून तू मंदिरात हात जोडून बसली आहेस’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुझे वडील मुस्लिम आहेत आणि तू इथे मंदिरात पूजा करतेय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. काहींनी थेट साराला तिचं नावं बदलण्याचा सल्ला दिला आहे. या कमेंट्सनंतर साराच्या चाहत्यांनी तिची बाजू मांडली आहे. ‘साराची आई अमृता सिंग आणि वडील सैफ अली खान आहेत. त्यामुळे ती दोन्ही धर्म पाळू शकते’, असं एका चाहत्याने म्हटलंय. तर ‘देवाची प्रार्थना धर्माचा विचार करून केला जात नाही’, असं दुसऱ्याने लिहिलंय.
सारा आणि विकीचा ‘जरा हटके, जरा बचके’ हा चित्रपट येत्या 2 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा एका जोडप्याची प्रेमकहाणी आणि घटस्फोट याभोवती फिरते.