हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांची प्रकृती गंभीर आहे. हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. 71 वर्षीय सरथ बाबू यांच्या शरीरातील विविध अवयव निकामी झाल्याचं कळतंय. वैद्यकीय भाषेत त्याला मल्टी-ऑर्गन डॅमेज असं म्हटलं जातं. ते सेप्सिस या आजाराने ग्रस्त आहेत. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना 20 एप्रिल रोजी बेंगळुरूमधून हैदराबादच्या रुग्णालयात हलविण्यात आलं. रविवारी त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर आहेत.
सेप्सिस आजारामुळेच सरथ बाबू यांच्या किडनी, लिवर आणि फुफ्फुसांवर परिणाम झाल्याचं कळतंय. सेप्सिस हा एक गंभीर आजार आहे. त्याच्यामुळे शरीरातील अवयव एकेक करून निकामी होण्याचा धोका असतो. गेल्या काही आठवड्यांत सरथ यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी असंख्य चाहते प्रार्थना करत आहेत.
सेप्सिस हा कोणत्याही संसर्गास शरीराकडून दिला जाणारा तीव्र प्रतिसाद आहे. हा जीवघेणा आजार आहे. सेप्सिस तेव्हा होतो तेव्हा शरीर आधीच एखाद्या संसर्गाचा बळी ठरतो. सेप्सिसमुळे संपूर्ण शरीरात एकामागोमाग प्रतिक्रिया सुरू होतात. ज्या संक्रमणामुळे सेप्सिस होतो, तो संपूर्ण शरीरात जलद गतीने पसरू लागतो. हळूहळू त्यामुळे फुफ्फुसे, त्वचा, यकृत यांवर परिणाम होऊ लागतो.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते सरथ बाबू यांचं पूर्ण नाव सत्यम बाबू दीक्षितुलू असं आहे. गेल्या पाच दशकांपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल 230 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. त्यांनी आतापर्यंत 9 वेळा नंदी पुरस्कार आपल्या नावे केला आहे. 1973 मध्ये ‘राम राज्यम’ या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. अखेरचे ते ‘वसंता मुलई’ या चित्रपटात झळकले आहेत.