‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. याच मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दीपिका आणि शोएबने 2018 मध्ये निकाह केला. दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे. त्याआधी 2011 मध्ये तिने रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 2015 मध्ये दीपिकाने रौनकला घटस्फोट दिला. रौनकशी विभक्त झाल्यानंतर दीपिकाचं नाव शोएबशी जोडलं गेलं. दुसऱ्या धर्मात लग्न करण्याविषयी दीपिकाच्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबाबत तिच्या पतीने खुलासा केला आहे.
शोएबने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाबाबत दीपिकाच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल सांगितलं. शोएबने सांगितलं की त्याचे आईवडील या लग्नाला तयार होते. जेव्हा त्याने त्याच्या आईची दीपिकाशी पहिली भेट करून दिली होती, तेव्हा त्यांना समजलं होतं की त्यांचा मुलगा दीपिकावर खूप प्रेम करतो. “लव्ह मॅरेजच्या बाबतीत दुसऱ्या धर्मात मुलीचं लग्न करून देताना अनेकदा कुटुंबीय साशंक असतात. मात्र दीपिकाच्या बाबतीत असं काहीच नव्हतं. उलट तिच्या वडिलांना या लग्नाबाबत कोणतीच समस्या नव्हती. ते मला म्हणाले, तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही तयार आहोत. हा आनंद तुमचाच आहे. तुम्हालाच पुढे एकत्र आयुष्य काढायचं आहे,” असं शोएबने सांगितलं.
दीपिकाच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला असून तिची आई तिच्यासोबतच राहते. तर वडील दीपिका आणि शोएबला भेटायला येत असतात. दीपिका आणि शोएबने 2018 मध्ये लग्न केलं. शोएबशी लग्न केल्यानंतर दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला होता. यासाठी तिने तिचं नाव बदलून फैजा असं ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वी खुद्द दीपिकाने याची कबुली दिली होती. या दोघांना रुहान नावाचा एक मुलगा आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नंसी आणि अभिनयक्षेत्राला रामराम करण्याविषयी वक्तव्य केलं होतं. याविषयी पती शोएबशीही चर्चा केल्याचं तिने सांगितलं होतं. “मी गरोदरपणाच्या या टप्प्याचा फार आनंद घेतेय. शोएब आणि माझी उत्सुकता वेगळ्याच पातळीवर आहे. मी फार कमी वयात कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर सलग 10 ते 15 वर्षे मी काम केलं. गरोदर झाल्यानंतर मी शोएबला सांगितलं होतं की मला अभिनयक्षेत्र सोडायचं आहे. मला एक गृहिणी आणि आई म्हणून पुढचं आयुष्य जगायचं आहे”, असं ती म्हणाली होती.