Satish Kaushik : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का लागला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. अभिनेते, विनोदी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते… या सर्वच क्षेत्रात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सतीश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही. अशात एक महिला मी त्यांच्यासाठी कही करु शकली असती तर… असं म्हणाली. सतीश यांच्या निधनावर दुःख व्यक्त करणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून सतीश कौशिक यांची भाची आहे.
सतीश कौशिक यांच्या निधनावर भाची दुःख व्यक्त करत म्हणाली, ‘मी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी काही करु शकली असती तर… ते अद्यापही तरुण होते. त्यांची एक मोठी बहीण आहे. एक भाऊ आहे. आता ते कसे जिवंत राहतील? खऱ्या आयुष्यात त्यांनी लोकांच्या मनात घर केलं. चांगल्या लोकांनाच देव लवकर बोलावून घेतो..’ असं सतीश यांची भाची म्हणाली.
सतीश यांच्या निधनावर अभिनेत्री कंगना रनौत हिने देखील दुःख व्यक्त केलं आहे. ‘या भयानक बातमीसह माझी सकाळ झाली आहे. ते माझे सर्वात मोठे चीयरलीडर होते. एक प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक खऱ्या आयुष्यात मात्र दयाळू आणि उत्तम व्यक्ती होते. त्यांना इमरजेंसी सिनेमात दिग्दर्शक करणं मला आवडलं होतं. त्यांची कायम आठवण येईल ओम शांती…’ सध्या सर्वत्र सतीश कौशिक यांच्या निधनाची चर्चा आहे.
अनुपम खेर यांनी ट्विट करून सतिश कौशिक यांच्या निधनाची बातमी दिली. तसेच आपल्या मित्राबद्दलची भावनाही व्यक्त केली. मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आमच्या 45 वर्षाच्या मैत्रीला अचानक असा पूर्णविराम लागला आहे. हरी ओम शांती. आता सतिश शिवाय आयुष्य पुन्हा पूर्वी सारखं राहणार नाही, असं अनुपम खेर म्हणाले.
सतीश कौशिक यांचं पार्थिव शरीर सध्या गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आता त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दिल्लीतील दीनदयाल रुग्णालयात नेण्यात येणार आहे. जिथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांचं पार्थिव शरीर मुंबई येथे आणण्यात येणार आहे.