मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सतीश कौशिक यांचं बुधवारी दिल्लीत हार्ट अटॅकने निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव गुरुवारी अंधेरी इथल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं. रात्री वर्सोवा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश कौशिक यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांसह इंडस्ट्रीतील सहकलाकारांचे डोळे पाणावले होते. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर ढसाढसा रडले. सतीश कौशिक यांची 10 वर्षांची मुलगी वंशिका हिने अंत्यविधीनंतर सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहतेसुद्धा भावूक झाले आहेत.
वंशिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या वडिलांना मिठी मारून हसताना दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने फक्त हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. मात्र मुलीसोबतचा सतीश कौशिक यांचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांचेही डोळे पाणावले आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे’, असं एका युजरने लिहिलं आहे. तर अनेकांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सतीश कौशिक यांच्या लग्नानंतर त्यांच्या घरी मुलगा जन्मला होता. मात्र त्यांचा मुलगा फार काळ जगू शकला नाही. वयाच्या 56 व्या वर्षी सतीश कौशिक आणि त्यांच्या पत्नीला सरोगसीद्वार वंशिका ही मुलगी झाली.
सतीश कौशिक बुधवारी मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेले होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधी त्यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही मृत्यूचे निश्चित कारण न समजल्याने त्यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार्टर विमानाने पार्थिव मुंबईत आणण्यात आलं.
अनुपम खेर, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, जॉनी लिव्हर, जावेद अख्तर, बोनी कपूर, पंकज त्रिपाठी यांसारख्या कलाकारांनी आपल्या लाडक्या सहकलाकाराला अंतिम निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती.
मूळचे हरयाणाचे असलेल्या सतीश कौशिक यांनी दिल्लीत कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि FTII मधून प्रशिक्षण पूर्ण केलं. कामासाठी मुंबईची वाट पकडलेल्या सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरही काम केलं.