मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. आता ही जोडी लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कियारा आणि कार्तिक आता ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत
नुकतंच या चित्रपटाचं नवीन गाणं ‘नसीब से’ या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या गाण्यात कार्तिक आणि कियाराचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. नसीब से या गाण्यात कार्तिक आणि कियारा मोहरीच्या शेतात रोमांस करत एकमेकांच्या मिठीत हरवलेले दिसत आहेत. सध्या चाहत्यांच्या हे गाणं चांगलंच पसंतीस पडलं आहे. या गाण्याचा टीझर कार्तिकने सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या तो चांगलाच व्हायरल होतोय.
कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नसीब से या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. हा टीजर शेअर करत त्यांनं म्हटलं आहे की, अप्रतिम लव्ह सॉंग ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होते. हे गाणं उद्या सकाळी 11 वाजता प्रदर्शित होईल. तसेच कार्तिकने शेअर केलेल्या या गाण्याचा टीझर प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडला असून सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच चर्चेत आहे.
सत्य प्रेम की कथा हा चित्रपट पुढच्या महिन्यात 29 जून या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियारा सोबत गजराज राव आणि सुप्रिया पाठक हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे कियाराचा तिच्या लग्नानंतरचा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे चाहते तिला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.