अभिनेता रणदीप हुडाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुआधार कमाई करत नसला तरी या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं आणि रणदीप हुडाच्या दिग्दर्शनाचं अनेकांकडून कौतुक होत आहे. हा चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित रणदीपच्या मेहनतीची प्रशंसा केली आहे. यात मराठी कलाकारांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी रणदीपच्या चित्रपटाबद्दल खास पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता अभिनेता सौरभ गोखलेनं इन्स्टाग्रावर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
‘रणदीप हुडा या माणसाच्या डेडिकेशनला सलाम आहे. साक्षात याने तात्याराव समोर उभे केले. ही व्यक्तिरेखा तो जगलाय. वीर सावरकरांचं संपूर्ण आयुष्य आणि कार्य 2 तासांत दाखवणं हे केवळ अशक्य आहे आणि आताची पिढी या व्यक्तिमत्वापासून ठरवून तोडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असण्याच्या काळात एका अमराठी माणसाने प्रचंड अभ्यास करून ही व्यक्तिरेखा लोकांसमोर उभ करणं हे अत्यंत धाडसाचं आणि अभिमानास्पद कार्य. नतमस्तक! अमित सियाल, राजेश खेरा, अंकिता लोखंडे आणि इतर सर्वांची कामेही अप्रतिम. न चुकता हा चित्रपट प्रत्येकाने बघा,’ अशा शब्दांत त्याने कौतुक केलंय.
22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज सात दिवस पूर्ण झाले आहेत. या सात दिवसांत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने 11.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचा बजेट 20 कोटी रुपये इतके आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा धीम्या गतीने कमाई सुरू आहे. रणदीपने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी त्याला प्रचंड बॉडी ट्रान्सफॉर्मेशनही करावं लागलं. सुरुवातीला या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. मात्र शूटिंगदरम्यान काही मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी चित्रपटातून काढता पाय घेतला आणि त्यानंतर रणदीपने दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी जबाबदाऱ्या पेलल्या आहेत.
पहिला दिवस- 1.05 कोटी रुपये
दुसरा दिवस- 2.25 कोटी रुपये
तिसरा दिवस- 2.7 कोटी रुपये
चौथा दिवस- 2.15 कोटी रुपये
पाचवा दिवस- 1.05 कोटी रुपये
सहावा दिवस- 1 कोटी रुपये
सातवा दिवस- 1.15 कोटी रुपये