‘स्कॅम 1992’ फेम अभिनेत्याने हात जोडून केली कामाची मागणी; म्हणाला ‘मी विनंती करतो..’

| Updated on: Apr 15, 2023 | 12:15 PM

कामाची मागणी करणाऱ्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी लिहिलं, 'हे करण्यासाठी मला खूप विचार आणि ताकद लागली. पण माझ्या वरिष्ठांनी आणि गुरुंनी म्हटल्याप्रमाणे काम मागण्यात कसली लाज? म्हणूनच मला जे वाटलं ते मी व्यक्त केलं.'

स्कॅम 1992 फेम अभिनेत्याने हात जोडून केली कामाची मागणी; म्हणाला मी विनंती करतो..
Scam 1992
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : ऑक्टोबर 2020 मध्ये हंसल मेहता यांनी ‘स्कॅम 1992’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. स्टॉकब्रोकर हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित ही वेब सीरिज होती. यामध्ये अभिनेता प्रतीक गांधीने हर्षद मेहताची भूमिका साकारली होती. त्याच्यासोबतच या सीरिजमध्ये श्रेया धन्वंतरी, सतीश कौशिक यांच्याही भूमिका होत्या. या सीरिजमध्ये अभिनेता हेमंत खेर यांनी हर्षद मेहताच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. सध्या त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कामाची मागणी केली आहे. इंडस्ट्रीतील लेखक, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर्स यांना त्याने विनंती केली आहे.

हेमंत खेर यांनी या ट्विटमध्ये लिहिलं, ‘लेखक, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर आणि क्रिएटर्स यांना मी विनंती करतो की मला त्यांच्या कथेत, चित्रपटात, सीरिजमध्ये किंवा लघुपटात काम करण्याची संधी द्यावी. एक अभिनेता म्हणून मी काम करण्यास खूप उत्साही आहे.’ हेमंत यांच्या या ट्विटवर विविध कमेंट्स येण्यास सुरुवात झाली. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आमिल कियान खानने त्यावर प्रतिक्रिया दिली. त्याने अजय देवगणच्या ‘भोला’ आणि ‘रनवे 34’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘नोंद केली आहे’ अशी कमेंट करत त्याने हेमंत यांच्या पोस्टची दखल घेतली. म्हणजेच भविष्यातील प्रोजेक्ट्ससाठी हेमंत यांचा विचार करणार असल्याचं त्याने सांगितलं. इतकंच नव्हे तर सह-लेखक संदीप केवलानी आणि अंकुश सिंग यांनाही त्याने टॅग केलं. यांनी ‘भोला’ची पटकथा आणि संवाद आमिलसोबत मिळून लिहिले होते.

हे सुद्धा वाचा

13 एप्रिलच्या या ट्विटनंतर हेमंत खेर यांनी 14 एप्रिल रोजी आणखी एक ट्विट केलं. कामाची मागणी करणाऱ्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी लिहिलं, ‘हे करण्यासाठी मला खूप विचार आणि ताकद लागली. पण माझ्या वरिष्ठांनी आणि गुरुंनी म्हटल्याप्रमाणे काम मागण्यात कसली लाज? म्हणूनच मला जे वाटलं ते मी व्यक्त केलं. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी खूप आभारी आहे.’

याआधी अशा बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित कामाची मागणी केली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनीसुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित कामाची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना बऱ्याच भूमिका मिळाल्या आहेत.