अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहैल खान आणि त्याची पत्नी सीमा सजदेह यांनी लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. 2022 मध्ये हे दोघं विभक्त झाले. जेव्हा एखादं जोडपं घटस्फोटाचा निर्णय घेतो, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर अधिक होत असल्याची भावना सीमाने नुकत्याच एका मुलाखतीत बोलून दाखवली. सीमा आणि सोहैल यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. घटस्फोटाचा या दोघांवर काय परिणाम झाला, याबद्दल सीमा मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटाचा अनपेक्षित फटका मुलांना बसतो, असं ती म्हणाली.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सीमाने सांगितलं, “जेव्हा पती-पत्नी विभक्त होतात, तेव्हा त्याचा अनपेक्षित फटका मुलांना बसतो. अर्थातच त्यात मुलांचा काही दोष नसतो. आपल्या आईवडिलांचा घटस्फोट व्हावा, असं कोणालाच वाटत नाही. त्याचवेळी लोक मुलांना पीडित असल्यासारखं वागवतात. जणू काही ते शोकांतिकेच आहेत. पण सत्य हे आहे की तुमच्या मुलांना लहानाचं मोठं होताना प्रेम काय असतं हे माहीत असावं आणि त्याचा अनुभव त्यांनी घ्यावा, असं तुम्हाला एक पालक म्हणून वाटत असतं. क्लेशकारक वैवाहिक जीवन हे कोणत्याच मुलांसाठी ठीक नसतं. मुलांची जडणघडण चांगल्या वातावरणात व्हावी ही पालकांची जबाबदारी असते. त्यासाठी त्यांची मानसिक स्थितीसुद्धा चांगली असायवा हवी.”
“मला असं वाटतं की जर तुम्ही खुश नसाल तर तुम्ही तुमच्या मुलांनाही खुश ठेवू शकणार नाही. जर माझा मूड चांगला नसेल तर पूर्ण वेळ माझी चिडचिड होत राहील. तीच चिडचिड, तोच राग अप्रत्यक्षपणे माझ्या मुलांवर निघेल. पण जर का माझं मन शांत असेल, तर मी त्यांनासुद्धा आनंदी ठेवू शकेन. संसार संपवण्यासाठी कोणीच लग्न करत नाही. तुम्हाला कायम आनंदाने त्या नात्यात राहायचं असतं. परंतु परिस्थिती आणि लोक नेहमी सारखे नसतात. वेळेनुसार माणूस बदलत जातो. मी नेहमी माझा मुलगा निर्वाणला सांगते की, आमच्या प्रेमामुळेच तुमचा जन्म झाला. आयुष्यात काही गोष्टी चुकीच्या घडतात, पण आजही आपण एक कुटुंब म्हणून सोबत आहोत. आजही आपल्यात तेवढंच प्रेम आहे”, असं मत सीमाने मांडलं.