मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. चित्रपटाविषयी ट्विट करत त्यांनी बंदीची मागणी करणाऱ्यांना फटकारलं आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू आहे. तमिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
‘द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या बंदीची मागणी करणारे लोक हे तितकेच चुकीचे आहेत जितके ते आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करत होते. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने चित्रपट पास केल्यानंतर कोणालाही घटनात्मक अधिकार आपल्या हाती घेण्याचा हक्क नाही’, असं त्यांनी लिहिलं आहे.
एकीकडे चित्रपटावरून वाद सुरू असताना दुसरीकडे या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ने आतापर्यंत 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. केरळमधील 30 हजारांपेक्षा अधिक मुली गायब झाल्या आणि नंतर त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत सामील करून घेतल्याचं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं होतं. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता.
Those who speak of banning #The Kerala Story are as wrong as those who wanted to ban Aamir Khan’s #Laal Singh Chaadha. Once a film has been passed by the Central Board of Film Certification nobody has the right to become an extra constitutional authority .
— Azmi Shabana (@AzmiShabana) May 8, 2023
केरळ हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह असं काहीच न दाखवल्याने कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचं परीक्षण करून त्याला सर्टिफिकेट दिल्याने थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी तो योग्य असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इनानी आणि सोनिया बिहानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
शुक्रवार – 8 कोटी रुपये
शनिवार – 11.22 कोटी रुपये
रविवार- 16.60 कोटी रुपये
आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट गेल्या वर्षी 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीही सोशल मीडियावर ‘बॉयकॉट बॉलिवूड’चा ट्रेंड सुरू झाला होता. परिणामी आमिरच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा आकडाही पार केला नाही.