Jawan | ‘जवान’च्या स्क्रिप्टमध्ये ‘बेटे को हाथ लगाने से..’ डायलॉगच नव्हता; मग शाहरुखने का म्हटलं?

| Updated on: Sep 14, 2023 | 7:09 PM

'जवान' या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातील एक डायलॉग तुफान गाजला होता. “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर”, असा हा डायलॉग होता. मात्र मूळ स्क्रिप्टमध्ये तो लिहिलाच नव्हता.

Jawan | जवानच्या स्क्रिप्टमध्ये बेटे को हाथ लगाने से.. डायलॉगच नव्हता; मग शाहरुखने का म्हटलं?
Follow us on

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. तर दुसरीकडे या चित्रपटातील डायलॉग्स, गाणी आणि ॲक्शन सीन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या चित्रपटातील ‘बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर’ हा डायलॉग ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर फार चर्चेत आला होता. पण तुम्हाला माहितीय का, चित्रपटाच्या मूळ स्क्रिप्टमध्ये या डायलॉगचा समावेशच नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘जवान’चे संवादलेखक सुमित अरोरा यांनी याबद्दलचा खुलासा केला.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ‘जवान’चे संवादलेखक सुमीत अरोरा यांनी सांगितलं की चित्रपटात शाहरुख खानच्या विक्रम राठोड या भूमिकेने म्हटलेला ‘बाप-बेटा’चा डायलॉग मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हता. याविषयी ते म्हणाले, “ही कथा तुम्हाला चित्रपटाच्या जादूशी जोडून ठेवते. हा डायलॉग मूळ ड्राफ्टमध्ये नव्हता. शाहरुख सरांच्या भूमिकेची एण्ट्री कोणत्याच डायलॉगशिवाय होती. मात्र शूटिंगदरम्यान असं वाटलं की त्या भूमिकेला एखादा तरी डायलॉग दिला पाहिजे होता. मी तिथे सेटवरच होतो आणि मला पटकन तिथे बोलावलं गेलं. त्यावेळी माझ्या तोंडून हाच डायलॉग निघाला की, बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर. त्या क्षणी त्या सीनला हाच डायलॉग योग्य वाटेल असं मला जाणवलं. दिग्दर्शक अटली आणि शाहरुख सरांनाही हा डायलॉग आवडला. म्हणूनच त्यांनी तो सीनमध्ये त्यावेळी समाविष्ट केला.”

“शाहरुख सरांनी हा डायलॉग ज्या पद्धतीने म्हटला, ते खरंच लाजवाब होतं. मात्र आम्ही त्यावेळी इतका विचार केला नव्हता की हा डायलॉग खूप हिट होईल आणि लोकांना तो आवडेल. लेखक म्हणून तुम्ही फक्त डायलॉग लिहू शकता, बाकी सर्व त्याचं स्वत:चं नशीब असतं”, असं ते पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शाहरुखने या डायलॉगद्वारे एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडेंना टोला लगावला, असं नेटकरी म्हणाले. ट्विटरवरही हाच डायलॉग तुफान ट्रेंड झाला होता. समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. 2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी केली होती. या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केली जात असल्याचा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. या छापेमारीत शाहरुख खानचा मुलगा आर्यनलाही अटक झाली होती. त्यावेळी समीर वानखेडे हेच मुंबई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक होते. आर्यन खान याप्रकरणी जवळपास महिनाभर तुरुंगात होता. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली.