बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानने आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केलंय. मात्र इंडस्ट्रीतल्या एका अभिनेत्रीच्या पतीला तो बॉलिवूडचा ‘जावई’ मानतो. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनुष्का शर्मा आहे. अनुष्काने शाहरुखच्याच ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर जब तर है जान आणि झिरो यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो अनुष्काचा पती आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहलीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. विराटसोबत मी बराच वेळ घालवला आहे, कारण तो अनुष्काला भेटायला सतत सेटवर यायचा, असं त्याने सांगितलं आहे. त्यामुळे जेव्हापासून अनुष्का आणि विराट एकमेकांना डेट करत आहेत, तेव्हापासून शाहरुख त्याला चांगल्याप्रकारे ओळखतो.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शाहरुख पुढे म्हणाला, “मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. मला तो खूप आवडतो. आम्ही त्याला बॉलिवूडचा जावई म्हणतो. इतर खेळाडूंपेक्षा मी विराटला सर्वाधिक ओळखतो. मी विराट आणि अनुष्का या दोघांनाही बऱ्याच काळापासून ओळखतो आणि त्यांच्यासोबत मी बराच वेळ घालवला आहे. जेव्हापासून तो अनुष्काला डेट करत होता, तेव्हापासून मी त्याला ओळखतोय. त्यावेळी मी अनुष्कासोबत चित्रपटाचं शूटिंग करत होतो आणि तो तिला भेटायला सेटवर यायचा. त्यामुळे आमच्यात मैत्रीपूर्ण नातं निर्माण झालंय.”
गेल्या वर्षी आयपीएलदरम्यान शाहरुख खान आणि विराट यांनी एकत्र डान्ससुद्धा केला होता. शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटातील ‘झुमे जो पठान’ या गाण्याचा ‘हुक स्टेप’ दोघांनी मिळून केला होता. याविषयी शाहरुखने सांगितलं की त्याने विराटला रवींद्र जडेजासोबत ती स्टेप करताना पाहिलं होतं. मात्र दोघांना ती स्टेप जमत नव्हती, म्हणून शाहरुखने त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. “माझ्या पठाण या चित्रपटातील एका गाण्याची स्टेप मी त्याला शिकवली होती. एका मॅचमध्ये मी त्याला रवींद्र जडेजासोबत ती स्टेप करताना पाहिलं होतं. दोघंही ती स्टेप करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना ते जमलं नाही. अखेर मी त्यांना ती स्टेप शिकवली होती”, असं किंग खानने सांगितलं.