गायक आदेश श्रीवास्तवचं 2015 मध्ये कॅन्सरने निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अवितेश हा इंडिस्ट्रीत करिअर करण्यासाठी धडपड करतोय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदेशची पत्नी आणि अभिनेत्री विजयता पंडितने सुपरस्टार शाहरुख खानला त्याच्या मुलाची मदत करण्याची विनंती केली आहे. आयुष्याच्या शेवटचा घटका मोजत असताना आदेशने शाहरुखकडून वचन घेतल्याचा खुलासा विजयता यांनी या मुलाखतीत केला. मुलगा अवितेशकडे खुणावत त्याची मदत करण्यासाठीचा इशारा आदेशने दिला होता, असं विजयता म्हणाली.
‘लेहरें रेट्रो’ला दिलेल्या या मुलाखतीत विजयता म्हणाली, “जेव्हा आदेश रुग्णालयात होता, तेव्हा शाहरुख खान आम्हाला भेटण्यासाठी यायचा. अखेरचा श्वास घेण्याच्या एक दिवस आधी आदेशने शाहरुखचा हात धरला आणि मुलगा अवितेशकडे खुणावलं. त्यावेळी तो काही बोलू शकला नव्हता, पण अवितेशकडे खुणावत जणू तो त्याची काळजी घेण्याची विनंती शाहरुखकडे करत होता.” आदेशच्या निधनानंतर शाहरुखने कुटुंबीयांशी कोणताच संपर्क न ठेवल्याचंही विजयताने म्हटलंय.
“आम्हाला जो मोबाइल नंबर दिला होता, तो आता बंद आहे. मला शाहरुखला ही आठवण करून द्यायची आहे की तो आदेश श्रीवास्तवचा खूप चांगला मित्र होता. हीच योग्य वेळ आहे शाहरुख. आम्हाला तुझी गरज आहे, माझ्या मुलाची मदत कर. त्याला फक्त थोड्याशा आधाराची गरज आहे. अवितेशसोबत तो रेड चिलीज बॅनरअंतर्गत चित्रपट बनवू शकतो. तो खूप चांगला अभिनेता आहे”, अशी विनंती विजयताने केली. आदेशचा मुलगा अवितेश हा सध्या ‘सिर्फ एक फ्रायडे’ या पदार्पणाच्या चित्रपटासाठी शूटिंग करतोय. विजयता ही संगीतकार जतीन-ललित यांची बहीण आहे. भावंडांनी शाहरुखच्या करिअरच्या सुरुवातीला त्याची कशाप्रकारे मदत केली, याचीही आठवण तिने या मुलाखतीत करून दिली.
“आज शाहरुख खान खूप मोठा स्टार आहे. पण त्याच्या करिअरमध्ये माझ्या भावंडांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी त्याच्या दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे, कुछ कुछ होता है, राजू बन गया जेंटलमन यांसारख्या चित्रपटांसाठी सुपरहिट गाणी दिली. शाहरुख इंडस्ट्रीत आला तेव्हा खूपच नवीन होता. माझ्या भावांनी त्याच्या यशात मोठी भूमिका बजावली आहे. त्याने याचा तरी किमान विचार करावा आणि माझ्या मुलाची मदत करावी”, असंही विजयता म्हणाली.