मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी त्याने मंगळवारी तिरुपतीमध्ये व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन घेतलं. यावेळी त्याच्यासोबत मुलगी सुहाना खान आणि ‘जवान’मधील सहअभिनेत्री नयनतारासुद्धा होती. नयनताचा पती आणि निर्माता विग्नेश शिवनसुद्धा त्यांच्यासोबत दिसला. तिरुपतीमधील शाहरुखचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दर्शनासाठी पोहोचलेल्या शाहरुखने शॉर्ट कुर्ता, मुंडू आणि त्यावर शॉल परिधान केला होता. तर सुहानाने पांढऱ्या रंगाचा सलवार-कुर्ता परिधान केला होता. मंदिरातून बाहेर पडताना त्याने हात जोडून इतर भक्तांना अभिवादन केलं.
गेल्या महिन्यात शाहरुखने जम्मू-काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावर्षी जानेवारी महिन्यात ‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीही शाहरुखने वैष्णो देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर त्याने ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर आता आठ महिन्यांनी ‘जवान’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जवान’ या चित्रपटाचा ऑडिओ लाँच चेन्नईमध्ये पार पडला. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी शाहरुख आणि त्याची टीम दुबईला पोहोचली होती. दुबईतील ‘बुर्ज खलिफा’ या इमारतीवर ‘जवान’चा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अटलीने केलं आहे. ‘जवान’च्या निमित्ताने दाक्षिणात्य दिग्दर्शक अटलीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. यामध्ये शाहरुख आणि नयनतारासोबतच विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोवर, योगी बाबू आणि रिधी डोग्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
#WATCH आंध्र प्रदेश: अभिनेता शाहरुख खान, उनकी बेटी सुहाना खान और अभिनेत्री नयनतारा ने तिरुपति के श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर पहुंचकर दर्शन किए। pic.twitter.com/zRr7bvQHgf
— ANI_HindiNews (@AHindinews) September 5, 2023
‘पठाण’नंतर ‘जवान’ हा शाहरुखचा या वर्षातील दुसरा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग जबरदस्त झाली आहे. त्यामुळे जगभरात चित्रपटाची एकूण कमाई 1000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असं म्हटलं जात आहे. असं झाल्यास एकाच वर्षात शाहरुखचे दोन चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतील.