अभिनेता शाहरुख खानच्या प्रकृतीविषयी त्याची मॅनेजर पूजा ददलानीने माहिती दिली आहे. शाहरुखला उष्माघाताचा त्रास झाल्याने अहमदाबादमधील के. डी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि सनराइझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान त्याला उष्माघाताचा त्रास जाणवला होता. केकेआर आणि सनराइझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2024 मधील पहिला प्लेऑफ सामना होता. म्हणूनच शाहरुख खान त्याच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी अहमदाबादला पोहोचला होता. आता शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने ट्विट करत त्याच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स दिले आहेत.
पूजाने ट्विटरवर लिहिलं, ‘मिस्टर खान यांच्या सर्व चाहत्यांना आणि शुभचिंतकांना मी सांगू इच्छिते की ते आता ठीक आहेत. तुमच्या प्रेमासाठी, प्रार्थनांसाठी आणि काळजीसाठी धन्यवाद.’ उष्णतेच्या लाटेमुळे शाहरुखची तब्येत बिघडल्याने सध्याच्या हवामानात काळजी घेण्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. शाहरुखला रुग्णालयात दाखल करताच त्याची पत्नी गौरी खान 22 मे रोजी अहमदाबादला पोहोचली. यानंतर कोलकाता नाइट रायडर्सची सहमालक आणि अभिनेत्री जुही चावलासुद्धा तिच्या पतीसह रुग्णालयात शाहरुखच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचली.
मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर KKR आणि SRH यांच्यात मॅच झाली. त्यावेळी शाहरुख खान हा त्याची मुलं सुहाना, अबराम आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यासोबत मॅच पाहण्यासाठी उपस्थित होता. त्याचवेळी त्याला उष्माघाताचा त्रास झाला. त्यानंतर त्याला तातडीने के.डी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याबाबत जुही चावलाने सांगितलं, “मंगळवारी रात्रीपासूनच त्याची तब्येत बरी नव्हती. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आधीपेक्षा तो आता बरं आहे. देवाच्या कृपेने तो लवकर बरा होईल. आयपीएलच्या अंतिम सामन्यात तो स्टेडियममध्ये उपस्थित राहून त्याच्या संघाला सपोर्ट करेल.”
गेल्या दोन दिवसांपासून शाहरुख हा अहमदाबादमध्येच होता. प्रचंड ऊन असल्यामुळे त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाला. केकेआरची मॅच संपल्यानंतर शाहरुख खान बराच वेळ मैदानात होता आणि चाहत्यांचे आभार मानत होता. त्यानंतर रात्री तो टीमसोबत अहमदाबादमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पोहोचला. मात्र 22 मे रोजी सकाळी शाहरुखची तब्येत बिघडली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.