मुंबई: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रासाठी पाठवला गेला. सेन्सॉर बोर्डाच्या समितीने निर्मात्यांना चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. यात पठाणमधील वादग्रस्त ठरलेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्याचाही समावेश आहे. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधी हे बदल केलेला व्हर्जन समितीकडे सुपूर्द करण्याचीही सूचना देण्यात आली आहे. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बेशरम रंग या गाण्यातील ज्या भगव्या बिकिनीवरून वाद झाला होता, ते बदलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादात अडकला आहे. यातील एका दृश्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. भगव्या रंगाची बिकिनी घालून बोल्ड दृश्ये देत दीपिकाने सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप विविध हिंदू संघटनांकडून करण्यात आला.
बेशरम रंग हे गाणं 12 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या गाण्यात दीपिका आणि शाहरुखची रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळाली. तर दीपिकाचा बोल्ड अंदाजसुद्धा चर्चेत राहिला. मात्र एका दृश्यातील भगव्या बिकिनीवरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला. ही दृश्ये बदलली नाही तर पठाण चित्रपटावर बहिष्कार घालू, असा इशारा देण्यात आला.
पठाणमध्ये शाहरुख आणि दीपिकासोबत जॉन अब्राहमचीही मुख्य भूमिका आहे. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत त्याची निर्मिती करण्यात आली.
“सेन्सॉर बोर्ड हे नेहमीच कल्पकता आणि लोकांची संवेदनशीलता यात योग्य ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करते. तुम्ही या मुद्द्यांवर योग्य उत्तर शोधाल असा आम्हाला विश्वास आहे”, असं सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांनी सांगितलं.