मुंबई : गेल्या आठवड्यात शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्यात शिरणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली. मन्नत बंगल्यात शिरल्यानंतर हे दोघं जवळपास आठ तास शाहरुखच्या मेकअप रुममध्ये लपले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पठाण साहिल सलीम खान आणि राम सराफ कुशवाह अशी या दोघांची नाव आहेत. गुजरातमधील भरूच इथून हे दोघं शाहरुखला भेटण्यासाठी आले होते. आठ तास मेकअप रुममध्ये लपल्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षकांनी पडकलं आणि पोलिसांकडे सोपवलं. या संपूर्ण प्रकरणी आता शाहरुखची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शाहरुखच्या बंगल्याबाहेर कडेकोड सुरक्षा असते. मात्र तरीसुद्धा हे दोघे जण बंगल्यात शिरण्यात यशस्वी ठरले होते. मुंबई पोलिसांच्या मते, या दोघांनी मध्यरात्री 3 च्या सुमारास मन्नत बंगल्याची भिंत ओलांडली होती आणि आत शिरल्यानंतर मेकअप रुममध्ये लपून बसले होते. चौकशीदरम्यान या दोघांनी सांगितलं की ते शाहरुखचे चाहते आहेत आणि त्यांना त्याला भेटायचं होतं.
अटक केलेल्या दोन्ही तरुणांचं वय हे 20 ते 25 वर्षांपर्यंतचं आहे. सर्वांत आधी त्यांना सिक्युरिटी गार्ड सतीशने पाहिलं. त्यानंतर ते दोघांना घेऊन शाहरुखजवळ गेले. शाहरुखने जेव्हा या दोन अनोळखी तरुणांना पाहिलं, तेव्हा त्याला धक्काच बसला. सतीशने 11 च्या सुमारास पोलिसांना याविषयीची माहिती दिली आणि त्यानंतर तपास सुरू झाला.
शाहरुखच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, त्याचा ‘जवान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘पठाण’च्या यशानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. 2018 मध्ये शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर शाहरुखने जवळपास चार वर्षांचा ब्रेक घेतला आणि पठाणच्या निमित्ताने कमबॅक केलं.