मुंबई : 14 मार्च 2024 | बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान हा ‘फॅमिली मॅन’ म्हणूनही ओळखला जातो. तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करणारा शाहरुख त्याच्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य देतो. पत्नी गौरी खान आणि त्याची तीन मुलं ही त्याच्यासाठी सर्वांच्याही आधी येतात. वेळ आणि वयोमानानुसार तो करिअर आणि कुटुंब अशा दोन्ही गोष्टींना पुरेपूर लक्ष देत असल्याचं काहीजण म्हणतील. मात्र शाहरुख हा सुपरस्टार बनण्याआधीही तसाच होता. करिअर किंवा स्टारडमसाठी त्याने कुटुंबीयांकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. आपल्या प्रोफेशनल आयुष्याचा परिणाम त्याने खासगी आयुष्यावर होऊ दिला नाही. शाहरुखने यासंदर्भात 1991 मध्ये दिलेली एक मुलाखत आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या मुलाखतीत शाहरुख म्हणाला, “फिल्म इंडस्ट्रीत काम करताना वाटेत येणाऱ्या चढउतारांचा मी फार विचार करत नाही. मला इतरांसारखं या इंडस्ट्रीत स्वत:ला हरवून घ्यायचं नाही. मला सत्य परिस्थितीचाही सामना करायचा आहे. मला स्वत:शीही तितकंच जोडून राहायचंय.” त्यावेळी शाहरुखने टीव्हीवर काही भूमिका साकारल्या होत्या. सर्कस, फौजी, दिल दरियाँ, दुसरा केवल, उम्मीद, वागले की दुनियाँ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं होतं.
फिल्म इंडस्ट्रीत येणाऱ्या अनेक कलाकारांनी प्रसिद्धीसाठी कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केलं. आपल्या जवळच्या व्यक्तींना ते पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. मात्र शाहरुखसाठी कामासोबतच कुटुंबही तितकंच महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्याचं काम तो करत आला आहे. याविषयी तो पुढे म्हणाला, “करिअरसाठी मी या गोष्टीचा त्याग केला, त्या गोष्टीचा त्याग केला.. अशा फालतू गोष्टी मला समजत नाहीत. तुम्ही दोन्ही गोष्टींमध्ये समतोल का साधू शकत नाही? कुटुंब, पत्नी किंवा प्रेयसीला दुर्लक्ष केल्याबद्दल तुम्ही दुसरं कारण का शोधत आहात? जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांना दुखावण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही.”
या मुलाखतीच्या वेळी शाहरुख गौरीला डेट करत होता. यश मिळाल्यानंतर जे लोक त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तीला विसरतात आणि त्यांना एखाद्या वस्तूप्रमाणे वागणूक देतात, अशा लोकांवर शाहरुख या मुलाखतीत भडकला होता. “मी कुठेतरी हे वाचलं होतं की एका अभिनेत्याने करिअरसाठी प्रेयसीचा त्याग केला. माझ्या प्रेयसीपेक्षा माझं काम खूप महत्त्वाचं आहे, असं काहीतरी फालतू तो म्हणाला होता. यापेक्षा किती खालच्या पातळीला तुम्ही जाऊ शकता? त्या व्यक्तीसोबत घालवलेल्या मौल्यवान क्षणांचं काय? हे किती मूर्खपणाचं आहे”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला होता.