मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनेमा लवकरच ५०० कोटी रुपायांचा गल्ला पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने आतापर्यंत तब्बल ४५६.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रविवारी सिनेमाने तब्बल १७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दोन आठवड्यात सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता सिनेमा अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘पठाण’ सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात तगडी कमाई केली. ‘पठाण’ पाठोपाठ ‘गदर २’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर मजल मारताना दिसत आहे. आता या शर्यतीत अभिनेता शाहरुख स्टारर ‘जवान’ सिनेमाची देखील एन्ट्री होणार आहे. किंग खान याचे चाहते देखील ‘जवान’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
‘जवान’ सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगने देखील विक्रम रचला आहे. काही चित्रपटगृहांमध्ये या सिनेमाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून, त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाताना दिसत आहे. काही मिनिटांतच जवानाची ॲडव्हान्स बुकिंगची सर्व तिकिटे विकली गेल्याची माहिती समोर येत आहे.
शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी आणखी दोन आठवडे आहेत. अशात ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून किंग खान याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चाहते ७ सप्टेंबर या दिवसाच्या प्रतीक्षेत आहेत. कारण ७ सप्टेंबर ‘जवान’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
यूएस, यूएई, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि जर्मनी यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय सेंटर्समध्ये ‘जवान’साठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. भारतात, मुंबईतील काही सेंटर्सनीच ॲडव्हान्स बुकिंग सुरू केली आहे. थक्क करणारी गोष्ट म्हणजे फक्त १५ मिनिटांमध्ये ‘जवान’ सिनेमाचे सर्व ॲडव्हान्स तिकिटं विक्री झाले आहेत.
‘जवान’ ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर सिनेमाचं शुटिंग पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, राजस्थान आणि औरंगाबाद येथे झाले आहे. यात शाहरुख खानसोबत विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि प्रियामणी यांच्या भूमिका आहेत. सिनेमात दीपिका पदुकोणचाही एक कॅमिओ आहे.