Shah Rukh Khan : दिल्ली हायकोर्टाने ‘या’प्रकरणी किंग खानच्या बाजूने सुनावला निर्णय; अभिनेत्याला दिलासा

| Updated on: Apr 26, 2023 | 4:34 PM

'पठाण' सिनेमाच्या यशानंतर 'या' कारणामुळे अभिनेता शाहरुख खान तुफान चर्चेत, दिल्ली हायकोर्टाकडून अभिनेता शाहरुख खान याला दिलासा... नक्की काय प्रकरण?

Shah Rukh Khan : दिल्ली हायकोर्टाने याप्रकरणी किंग खानच्या बाजूने सुनावला निर्णय; अभिनेत्याला दिलासा
Follow us on

मुंबई : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. पण सिनेमा मोठ्या पडद्यावर पोहोचण्यापूर्वी न्यायालयात पोहोचला आहे. किंग खान लवकरच ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर लीक झाले आहेत. सिनेमातील काही व्हिडीओ लीक झाल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने अभिनेत्याच्या बाजून निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जवान सिनेमाच्या लीक झालेल्या क्लिप काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी उच्च न्यायालयाने वेबसाइट्स, केबल टीव्ही प्लॅटफॉर्म, डायरेक्ट टू होम सर्व्हिस आणि इतर सर्व प्लॅटफॉर्मला जवान सिनेमाच्या कॉपीराइटचे उल्लंघन करण्यापासून रोकलं आहे.

शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा २ जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच जवान सिनेमाचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत. लीक झालेले दोन्ही व्हिडीओ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे आहेत. व्हिडीओ लीक झाल्यानंतर शाहरुख आणि गौरी खानची प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीजने उच्च न्यायालयात धाव घेतली, ज्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने YouTube, Google, Twitter आणि Reddit सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जवान सिनेमातील व्हिडीओ लीक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सिनेमा संबंधित व्हिडीओ दाखवणाऱ्या चॅनेल्सना ब्लॉक करण्याचे आदेश न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी इंटरनेट सर्विस प्रोवायडर्स दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

सिनेमा संबंधित दोन व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाल्याची तक्रार रेड चिलीज एंटरटेनमेंट दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली. पहिल्या व्हिडीओमध्ये शाहरुखचा फाईटिंग सीक्वेन्स होता. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये डान्स सिक्वेन्सचा होता, ज्यामध्ये शाहरुख आणि नयनतारा दिसत आहेत. सध्या याप्रकरणाची तुफान चर्चा रंगत आहे.

न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, सिनेमाच्या सेटवरून काही फोटोआणि व्हिडिओ लीक झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेक सोशल मीडिया हँडल सिनेमाशी संबंधित आणखी व्हिडिओ लीक करू शकतात. म्हणून घडणारा प्रकार थांबवणे आवश्यक आहे. सिनेमातील फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यास प्रमोशनवर परिणाम होईल, असेही न्यायालयाने पुढे म्हटले आहे.

‘पठाण’ सिनेमाच्या यशानंतर शाहरुख खान ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘पठाण’ सिनेमाने फक्त देशातच नाही तर, संपूर्ण जगात अनेक विक्रम मोडले. त्यामुळे किंग खान याचा आगामी सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.