शाहरुखचा ‘मन्नत’ बंगला आणखी 2 मजल्यांनी वाढवणार; करणार तब्बल इतके कोटी रुपये खर्च

| Updated on: Dec 12, 2024 | 8:32 AM

मन्नत बंगला हा आता मुंबईतील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलं आहे. शाहरुखच्या वाढदिवशी आणि ईदनिमित्त हजारो चाहते त्याच्या या बंगल्याबाहेर जमतात. 2001 मध्ये त्याने 13.32 कोटी रुपयांचा हा बंगला विकत घेतला होता. या सहा मजली आलिशान बंगल्याची आजची किंमत तब्बल 200 कोटी रुपयांहून अधिक आहे.

शाहरुखचा मन्नत बंगला आणखी 2 मजल्यांनी वाढवणार; करणार तब्बल इतके कोटी रुपये खर्च
शाहरुख खान, गौरी खान यांचा मन्नत बंगला
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूड सेलिब्रिटींची आलिशान लाइफस्टाइल ही चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरते. इंडस्ट्रीत वर्षानुवर्षे कठोर मेहनत केल्यानंतर, कोट्यवधींची संपत्ती कमावल्यानंतर शाहरुख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांसारख्या सेलिब्रिटींनी स्वत:साठी आणि कुटुंबीयांसाठी महागडे घर खरेदी केले आहेत. मुंबईतील काही सेलिब्रिटींची घरं की चाहत्यांसाठी आणि पर्यटकांसाठी जणू सेल्फी पॉईंटच ठरली आहेत. यात शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला चाहत्यांना विशेष प्रिय आहे. आता हाच मन्नत बंगला आणखी दोन मजल्यांनी वाढवण्याचा विचार शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान करत आहेत. सध्या या बंगल्यात दोन बेसमेंट्स, ग्राऊंड फ्लोअर आणि त्यावर अधिक सहा फ्लोअर्स आहेत. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार गौरीने ‘मन्नत’वर आणखी दोन मजले वाढवण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे (MCZMA) अर्ज दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रोजेक्टचा खर्च जवळपास 25 कोटी रुपयांच्या घरात आहे. प्रधान सचिव (पर्यावरण) प्रवीण दराडे यांच्या अध्यक्षतेखालील समिती बुधवारी गौरी खानच्या अर्जावर निर्णय घेणार आहे. गौरीने 9 नोव्हेंबर रोजी हा अर्ज दाखल केला होता. ‘मन्नत’ हा बंगला पूर्वी व्हिएना म्हणून ओळखला जायचा. शाहखने वांद्रेमधल्या बँडस्टँड इथं ‘येस बॉस’ या चित्रपटातील एक सीन शूट केला होता. तेव्हा त्याला नरिमन के. दुबाश यांनी 1914 मध्ये बांधलेला हा बंगला खूप आवडला होता. अखेर 2001 मध्ये त्याने हा बंगला विकत घेतला. हा बंगला ग्रेड थ्री हेरिटेज दर्जाचा असल्यामुळे शाहरुखला त्यात बरंच बांधकाम करण्याची परवानगी नव्हती. म्हणून त्याच्या मागे त्याने ‘मन्नत अॅनेक्सी’ म्हणून सहा मजली इमारत बांधली.

हे सुद्धा वाचा

शाहरुखने काही वर्षांपूर्वी गौरीच्या कॉफी टेबल बुकसाठीच्या एका कार्यक्रमात बंगल्याच्या खरेदीविषयी प्रतिक्रिया दिली होती. “त्यावेळी आमच्याकडे फार पैसे नव्हते. थोडेफार पैसे जमताच आम्ही हा बंगला विकत घ्यायचा आहे असं सांगितलं. ते आमच्या क्षमतेपलीकडचं होतं. तरीही तो बंगला विकत घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. बंगला विकत घेणं ही एक गोष्ट होती आणि त्यानंतर आम्हाला तो पुन्हा बांधावा लागला, तो खर्च वेगळा होता. कारण ते खूपच जीर्ण झालं होतं. बांधकामासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. आम्ही एका डिझायनरला बोलावलं होतं. तो घर कसा डिझाइन करेल हे सांगून त्याने आम्हाला लंचमध्ये जे जेवायला दिलं, ते तेव्हा मला मिळणाऱ्या एका महिन्याच्या पगारापेक्षा खूप जास्त होतं”, असं त्याने सांगितलं होतं.

अभिनेते मुकेश खन्ना यांनी एका मुलाखतीत शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या खरेदीचा एक किस्सा सांगितला होता. त्यावेळी शाहरुखने बंगला खरेदी करण्यासाठी निर्मात्यांकडे चित्रपटाचे संपूर्ण पैसे ॲडव्हान्समध्ये देण्याची विनंती केली होती. याविषयी ते म्हणाले, “शाहरुखला त्यावेळी बंगला विकत घ्यायचा होता. त्याने प्रेम ललवानी यांच्याकडे संपूर्ण पैसे ॲडव्हान्समध्ये देण्याचा विनंती केली होती. त्यावेळी 34-35 लाख रुपयांमध्ये घर विकत घेता यायचं. चित्रपटाचे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळाल्याने शाहरुख त्याचं पहिलं घर घेऊ शकला होता. ललवानी यांनी शाहरुखची विनंती ऐकली आणि त्यांनी संपूर्ण पैसे त्याला ॲडव्हान्समध्ये दिले होते. ललवानी यांच्यामुळेच मी घर घेऊ शकलो असं शाहरुखसुद्धा सांगतो.”