शाहरुख शिर्डीत साईचरणी लीन; ‘डंकी’च्या यशासाठी किंग खानचं साकडं

| Updated on: Dec 14, 2023 | 7:08 PM

'डंकी' या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला पोहोचला आहे. यावेळी त्याच्यासोबत मुलगी सुहाना खानसुद्धा उपस्थित होती. शाहरुखने डंकीचं पोस्टर साईंच्या चरणी अर्पण करत चित्रपटाच्या यशासाठी साकडं घातलं आहे.

शाहरुख शिर्डीत साईचरणी लीन; डंकीच्या यशासाठी किंग खानचं साकडं
Shah Rukh Khan at Shirdi
Image Credit source: Instagram
Follow us on

शिर्डी : 14 डिसेंबर 2023 | बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान याने आज शिर्डीतील साई दरबारी हजेरी लावत साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान आणि मॅनेजर पूजा ददलानीदेखील होती. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. चाहत्यांच्या गराडयातून मोठी कसरत करत साईमंदिर सुरक्षा रक्षकांनी त्याला मंदिरापर्यत पोहोचवलं. शाहरूख खानने साई समाधीवर निळी शॉल अर्पण केली. त्याचसोबत त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचं पोस्टर साईचरणी अर्पण करत शाहरुखने चित्रपटाच्या यशासाठी साकडं घातलं. त्याने साईबाबांच्या पाद्यपुजेचा लाभ घेतला आणि आरतीसुद्धा केली.

शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट येत्या 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय. त्याआधी शाहरुखने वैष्णोदेवी आणि साईबाबांचं दर्शन घेतलं. डंकी चित्रपटात शाहरुखसोबत विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी, सतीश शहा आणि इतर कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केला आहे. तब्बल 120 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार झाल्याचं कळतंय. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी साईबाबांची शाल, साईबाबांच्या जीवनावरील साईचरित्र ग्रंथ तसंच साई मूर्ती देऊन शाहरुख खानचा सत्कार केला.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

शाहरुखच्या ‘डंकी’ या चित्रपटासोबत ‘बाहुबली’ स्टार प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपटसुद्धा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या दोन्ही मोठ्या कलाकारांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर नेमका कोणाचा डंका वाजतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

डंकी हा शाहरुखचा या वर्षातील तिसरा चित्रपट आहे. जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुखने ‘पठाण’ या चित्रपटातून पुनरागमन केलं होतं. त्यानंतर त्याचा ‘जवान’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे मोठे विक्रम रचले आहेत. त्यामुळे आता ‘डंकी’च्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पठाण आणि जवानच्या प्रदर्शनापूर्वीही शाहरुखने वैष्णो देवीचं दर्शन घेतलं होतं.