मुंबई | 19 डिसेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौरी खान हिची चर्चा रंगली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गौरी खान ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप आहे. गौरी खान तुलसियानी ग्रुपची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. गौरी खान लखनऊ येथील रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तुलसियानी कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांचे अंदाजे 30 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी ईडी गौरी खानची चौकशी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
रिपोर्टनुसार, अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही देखील पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे गौरी खान ईडीच्या रडारवर आहे. गौरी खानला नोटीस बजावण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या मुख्यालयाची परवानगी घेण्याची तयारी सध्या सुरू आहे. परवानगी मिळाल्यानंतर ईडी गौरी खानची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तुलसियानी ग्रुपने गौरीला ब्रँड ॲम्बेसेडर होण्यासाठी किती पैसे दिले आणि ठरवण्यात आलेली रक्कम कशी देण्यात आली.. यांसारख्या अनेक गोष्टींची चौकशी अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी करतील. कंपनीच्या ब्रँड ॲम्बेसेडरसाठी कोणते करार झाले असून या कराराची कागदपत्रेही अंमलबजावणी संचालनालयाकडून गौरी खानकडून घेतली जाणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
लखनऊ याठिकाणी सुशांत गोल्फ सिटीमध्ये तुलसियानी ग्रुपचा एक प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये किरीट जसवंत शहा यांनी 2015 मध्ये 85 लाख रुपयांना एक फ्लॅट खरेदी केला होता. पण कंपनीने किरीट जसवंत यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. एवढंच नाही तर पैसे देखील परत केले नाहीत. म्हणून जसवंत शहा यांनी तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्यावर गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल करत, जसवंत शहा यांनी गौरी खान हिच्यावर देखील आरोप केले आहे. गौरी खान प्रोजेक्टची जाहिरात करत होती आणि याच विश्वासावर फ्लॅट खरेदी केला. पण जसवंत शहा यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आलेला नाही. याच प्रकरणी आता ईडीकडून अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिची चौकशी होऊ शकते.