मुंबई : 23 फेब्रुवारी 2024 | नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डमधील अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा व्हिडीओ तुफान चर्चेत आला. रेड कार्पेटवर करीना शाहिदसमोरून त्याला दुर्लक्ष करून गेली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या. शाहिद आणि करीना एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. आता एक्स कपल अशाप्रकारे एकमेकांसमोर आल्यानंतर त्याची जोरदार चर्चा झाली. या घटनेवर शाहिद कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.
‘रेडिओ मिर्ची’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला, “दोन लोक ऑकवर्ड आहेत हे तुम्ही कशावरून सिद्ध करू शकता? (विचित्र चेहरा करून दाखवतो) आम्ही एकमेकांकडे असं पाहत होतो का? तुम्ही तिथे होता का? तुम्हाला काय ऑकवर्ड वाटलं? मी उत्तर देऊ का? जर मी आणि करीनाने एकत्र फोटो क्लिक केला असता तर लोकांनी फक्त त्याबद्दल लिहिलं असतं आणि फक्त त्याचीच चर्चा झाली असती. आम्ही तिथे ‘उडता पंजाब’ची टीम म्हणून आलो होतो आणि त्याचं योग्य प्रतिनिधित्व होणं गरजेचं होतं. म्हणूनच आम्ही याची काळजी घेतली की आपण अशाप्रकारे उभे राहू जेणेकरून फोटोग्राफर्सना ज्या फोटोंची अपेक्षा आहे, ते क्लिक करता येऊच नये. त्यातून काही वादग्रस्त घडावं आणि वेगळाच अर्थ काढला जावा, अशी अजिबात अपेक्षा नव्हती. आमच्या चित्रपटाचं योग्य प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्हाला योग्य राहायचं होतं.”
व्हायरल व्हिडीओमध्ये पहायला मिळालं की शाहिद त्याच्या हातात ट्रॉफी घेऊन रेड कार्पेटवर उभा होता. त्याच्यासोबत आणखी दोघं जण होते. त्याचवेळी करीना त्याच्यासमोरून जाते आणि शाहिदसोबत उभ्या असलेल्या एका व्यक्तीला हसून अभिवादन करते. यावेळी शाहिदचीही नजर करीनाकडे वळते. शाहिदसमोर न थांबता किंवा त्याच्याशी एकही शब्द न बोलता करीना पुढे निघून जाते आणि पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देते.
शाहिद कपूर आणि करीना कपूरची जोडी ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती. हे दोघं जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. शाहिद आणि करीनाच्या अफेअरने बी-टाऊन आणि चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. पहिल्याच भेटीत करीनाला शाहिद आवडला होता. या भेटीनंतर लगेचच दोघं एकमेकांना डेट करू लागले होते.