मुंबई : अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आलिया भट्टविषयी केलेल्या वक्तव्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. शाहिद कपूर आणि आलिया भट्टने ‘उडता पंजाब’ आणि ‘शानदार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. आलियाविषयी बोलताना तो म्हणाला, “ती आई झाली यावर मला अजूनही विश्वास बसत नाहीये.” शाहिदचं हेच वक्तव्य काहींना पटलं नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
या मुलाखतीत शाहिदला विचारण्यात आलं होतं की, तो आलिया भट्टला भेटला तर काय करेल? त्यावर उत्तर देताना शाहिदने आलियासोबत शूटिंगदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, “मी जेव्हा आलियासोबत काम केलं होतं, तेव्हा ती फक्त 21 वर्षांची होती. आता ती आई झाली आहे यावर मला विश्वासच होत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत खूप वेळ घालवता आणि नंतर बराच काळ तुम्ही एकमेकांना भेटलेले नसता, तरीही तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती जशीच्या तशीच आहे. त्या व्यक्तीमध्ये फारसा काही बदल झाल्याचं तुम्हाला वाटत नाही.”
शाहिदला याच वक्तव्यावरून ट्रोल केलं जातंय. काहींनी त्याच्या पत्नीवरूनही कमेंट केली. ‘जेव्हा शाहिदने लग्न केलं तेव्हा मीरा 20 वर्षांची होती आणि शाहिद 34 वर्षांचा होता. आलिया ही मीरापेक्षा फक्त एक वर्षाने मोठी आहे,’ असं एकाने लिहिलं. तर ‘मीरा आई झाली तेव्हा ती फक्त 21 वर्षांची होती’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. या ट्रोलिंगदरम्यान काहींनी शाहिदचीही बाजू घेतली आहे.
काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमुळेही शाहिद चर्चेत होता. या मुलाखतीत त्याने लग्नाविषयी वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात आली होती. फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला होता, “हे लग्न म्हणजे फक्त एका गोष्टीबद्दल असतं. तो माणसू त्याच्या आयुष्यात गोंधळलेला होता आणि त्याचा गुंता सोडवण्यासाठी ती स्त्री आयुष्यात येते. त्यामुळे पुढील सर्व आयुष्य म्हणजे त्याला सुधारण्याचा आणि चांगला व्यक्ती बनण्याचा प्रवास असतो. आयुष्य हेच आहे.”
लग्नाबद्दल शाहिदचे हे विचार नेटकऱ्यांना आवडले नाहीत. ‘मला मान्य आहे की तू कबीर सिंगची भूमिका साकारली आहेत, पण चित्रपटानंतरही तू त्याच्यासारखं वागणं सोडलं पाहिजे’, असं एकाने म्हटलं होतं. तर ‘कबीर सिंगसुद्धा असाच होता’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं होतं.