मुंबई : अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या मुलाखतीत शाहिद लग्नाविषयी बोलताना दिसत आहे. “लग्न म्हणजे मुलीने मुलाला थाऱ्यावर आणणं”, अशा आशयाचं वक्तव्य त्याने केलं आहे. मात्र त्याचं हे मत नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलं नाही. अनेकांनी शाहिदला त्यावरून ट्रोल केलं असून काहींनी त्याची तुलना ‘कबीर सिंग’ या त्याच्याच चित्रपटातील पात्राशी केली आहे.
फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या या मुलाखतीत शाहिदने लग्नाविषयी त्याचं मत मांडलं आहे. “हे लग्न म्हणजे फक्त एका गोष्टीबद्दल असतं. तो माणसू त्याच्या आयुष्यात गोंधळलेला होता आणि त्याचा गुंता सोडवण्यासाठी ती स्त्री आयुष्यात येते. त्यामुळे पुढील सर्व आयुष्य म्हणजे त्याला सुधारण्याचा आणि चांगला व्यक्ती बनण्याचा प्रवास असतो. आयुष्य हेच आहे”, असं तो म्हणतो.
लग्नाबद्दल शाहिदचे हे विचार नेटकऱ्यांना आवडले नाहीत. अनेकांनी त्याच्या या व्हिडीओ कमेंट करत शाहिदला ट्रोल केलं आहे. ‘मला मान्य आहे की तू कबीर सिंगची भूमिका साकारली आहेत, पण चित्रपटानंतरही तू त्याच्यासारखं वागणं सोडलं पाहिजे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘कबीर सिंगसुद्धा असाच होता’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘महिला याचसाठी असतात का? मुलांना सुधारण्याचं एकमेव काम त्यांचं असतं का’, असा सवाही काही संतप्त नेटकऱ्यांनी केला आहे.
7 जुलै 2015 रोजी शाहिदने मीराशी अरेंज्ड मॅरेज केलं. या लग्नसोहळ्याला फक्त कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. मीरा आणि शाहिदला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मीरासोबतच्या लग्नाबद्दल शाहिद एका मुलाखतीत म्हणाला होता, “मी आता लग्नानंतर तिच्यावर प्रेम करू लागलोय. दररोज मला तिच्याशी प्रेम होतं. जेव्हा मी मीराला भेटलो, तेव्हा आम्ही जवळपास सात तास गप्पा मारत होतो. आम्ही लग्नाआधी फार वेळा डेटवर गेलो नाही. फक्त तीन-चार वेळा भेटलो होतो.”