मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. ‘पठाण’ सिनेमा फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील रोज नवे विक्रम रचताना दिसत आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर पठाण सिनेमा कोट्यवधी रुपयांची कमाई करताना दिसत आहे. दरम्यान राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रामध्ये ‘पठाण’ सिनेमाच्या स्क्रिनिंनचं आयोजन करण्यात आलं. सध्या राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रामधील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे माजी प्रेस सेक्रेटरी असलेल्या एसएम खान यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. २००२ ते २००७ पर्यंत एसएम खान हे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम प्रेस सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. नुकताच, एसएम खान यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रामध्ये आयोजित केलेल्या ‘पठाण’ सिनेमाच्या स्क्रिनिंनचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
At special screening of #Pathan at Rashtrapati Bhavan cultural centre. @iamsrk @pooja_dadlani pic.twitter.com/976WYSDovw
— SM Khan (@SmkhanDg) January 28, 2023
महत्त्वाचं म्हणजे, फार कमी सिनेमे आहेत ज्यांचं स्क्रिनिंग राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रामध्ये झालं. त्यापैकी एक सिनेमा म्हणजे अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा. पठाण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ‘बेशर्म रंग’ गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगामुळे वाद टोकाला पोहोचला. पण या वादाचा सिनेमावर कोणताही वाईट परिणाम झालेला नाही.
गेल्या चार दिवसांपासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. शिवाय पठाण सिनेमाचं स्क्रिनिंग राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रामध्ये झाल्यामुळे सिनेमाने आणखी एक विक्रम रचला आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे.
पहिल्या दिवशी पठाण सिनेमाने ५७ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाने तब्बल ७० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पण तिसऱ्या दिवशी मात्र पठाण सिनेमाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्या दिवशी सिनेमाने ३९ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. चौथा दिवस शनिवार असल्यामुळे सिनेमाने पुन्हा बॉक्स ऑफिसचवर उंच उडी मारली.
पठाण सिनेमाच्या चौथ्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. शनिवार असल्यामुळे सिनेमाने ५५ कोटी रुपयांचा कमाई केली आहे. म्हणजे पठाण सिनेमाच्या चार दिवसांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने २२१.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा आहे.