मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजन लोकप्रिय मालिका गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी जवळपास वर्षभरापूर्वी ही मालिका सोडली. मालिका सोडल्यानंतर त्यांनी निर्मात्यांवर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर निर्मात्यांविरोधातील खटलासुद्धा त्यांनी नुकताच जिंकला. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शैलेश यांनी मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.
‘लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शैलेश लोढा पहिल्यांदाच मालिका सोडण्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. निर्माते असित मोदी यांनी अत्यंत वाईट वागणूक दिली आणि अपमान केल्याचा आरोप शैलेश यांनी यावेळी केला. मालिकेत काम करत असताना त्यांना सब टीव्हीवरील ‘गुड नाइट इंडिया’ या स्टँड-अप शोमध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने निर्मात्यांनी शैलेश यांचा अपमान केला होता. “मी त्या कार्यक्रमासाठी शूट केलं होतं आणि तिथे मी एक कवितादेखील वाचून दाखवली होती. तो एपिसोड टेलिकास्ट होण्याच्या एक दिवस आधी मला निर्मात्यांनी फोन केला. त्यावेळी ते माझ्याशी ज्या भाषेत बोलले, ते ऐकून मला प्रचंड राग आला होता”, असं शैलेश म्हणाले.
“ते माझ्याशी ज्या पद्धतीने बोलले, ते मला सहन झालं नाही. शो फक्त एका व्यक्तीमुळे चालत नाही, तर त्यात अनेकांचे प्रयत्न असतात. म्हणून 17 फेब्रुवारी 2022 रोजी मी त्यांना मेल करून सांगितलं की मी यापुढे मालिकेत काम करणार नाही. सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर काही बोलण्याआधी मी त्यांची परवानगी का घ्यावी? हे माझे हक्क आहेत. माझी समस्या पैशांबाबत कधीच नव्हती. पण त्यांनी जी अपमानास्पद भाषा वापरली, त्याला माझा विरोध आहे”, असं त्यांनी पुढे सांगितलं.
असित मोदी यांच्यावर याआधी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनेही गंभीर आरोप केले होते. जेनिफरने असितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर तिने मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात असित मोदी आणि त्यांच्या प्रॉडक्शन टीममधील इतर दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र निर्मात्यांनी तिचे आरोप फेटाळले होते.