मुंबई : 24 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी सध्या चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियाद्वारे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. शमिता आता 44 वर्षांची असून नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती महिलांबाबतच्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर बोलताना दिसतेय. ‘पेरिमेनोपॉझ’ या स्थितीविषयी शमिता जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. अनेकदा या विषयावर बोलणं टाळलं जातं किंवा त्याची फारशी माहिती महिलांना नसते. मूड स्विंग्स, अचानक वजण वाढणं आणि इतरही बऱ्याच समस्यांचा सामना करत असल्याचा खुलासा शमिताने या व्हिडीओत केला आहे. “तुमच्यापैकी किती महिला अचानक वजन वाढल्यामुळे त्रस्त आहात? तुम्ही रोज तेच जेवण, तोच व्यायाम करूनही शरीरावर त्याचा फरक पडत नाही”, असं शमिता या व्हिडीओच्या सुरुवातीला म्हणतेय.
पुढे ती म्हणते, “अचानक माझी भूक वाढली, सतत मूड स्विंग्स होत आहेत, माझी नजर कमकुवत झाली आहे, हृदयाची धडधड वाढणे या सगळ्या गोष्टी खूप चिंता वाढवणाऱ्या आहेत. आधी मला असं वाटलं की हे सर्व मलाच होतंय. पण माझ्याच वयाच्या मैत्रिणींशी जेव्हा मी बोलले, तेव्हा त्यांनासुद्धा हीच लक्षणं जाणवल्याचं मला समजलं. याबद्दल मी अधिक माहिती शोधू लागले आणि तेव्हा मला एक लेख सापडला. त्यात पेरिमेनोपॉझबद्दल बोललं गेलंय.”
“पेरिमेनोपॉझ म्हणजे काय, हे मला माहीत नव्हतं. एका ठराविक वयानंतर आपण सर्व महिला अशा परिस्थितीचा सामना करतो, असं मला वाटलं होतं. पण तुम्ही 10 वर्ष आधीही पेरिमेनोपॉझचा सामना करू शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? महिलांसाठी हे वास्तव स्वीकारणं खूप कठीण आहे. आधी पिरीड्स, मग गर्भधारणेनंतर हार्मोनल बदल आणि आता त्या यादीत पेरिमेनोपॉझ हे नाव जोडलं गेलंय”, असं शमिता म्हणाली. याविषयी महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचं शमिताने सांगितलं.
“मला पूर्ण विश्वास आहे की माझ्यासारखंच अनेक महिलांना याविषयीची माहिती नसेल. आपल्याला याविषयी अधिकाधिक बोलावं लागेल आणि एकमेकांची मदत करावी लागेल. यात मी एकटीच नाही. खिल्ली उडवणारे, मस्करी करणारे बरेच व्हिडीओ बनवले जातात. पण एक महिला असणं काही सोपं नाही. आपण किती हार्मोनल बदलांचा सामना करतो, हे जाणून घेतल्यास आपल्यालाच वेड लागेल”, अशा शब्दांत शमिताने समजावण्याचा प्रयत्न केला.