मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार आणि हाडाचे कलाकार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी साकारलेल्या नथुराम या भूमिकेवर सध्या बऱ्याच चर्चा झडत आहेत. कुणी त्यांचं समर्थन करत आहे तर कुणी त्यांना विरोध करत आहे. याअगोदर नथुरामाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी या प्रकरणावर काय भूमिका असेल, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. याच प्रकरणावर त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मी नथुराम साकारल्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला विरोध केला नाही, छगन भुजबळ तर माझ्या पाठिशी होते, असं पोंक्षे म्हणाले. तर अमोल कोल्हेंची खासदारकी आज आहे, उद्या असेल की नाही माहीत नाही पण कलावंत म्हणून ते शेवटपर्यंत राहतील, असं म्हणत कोल्हेंच्या नथुरामला पाठिंबा दर्शवला आहे.
कोल्हेंची खासदारकी आज आहे, उद्या नसेन पण कलाकार शेवटपर्यंत असतील!
अमोल कोल्हे असेल किंवा इतर कोणी असतील आम्ही सर्व कलावंत आहोत. अमोल कोल्हे खासदार नंतर झाले, ते आधीपासून कलावंत आहेत. त्यांनी बरीच काम केलेली आहेत. त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते खासदार झाले. खासदारकी आज आहे उद्या असेल की नाही माहीत नाही पण पण कलावंत म्हणून ते शेवटपर्यंत राहतील. कलावंत म्हणून आलेली भूमिका आपल्याला आवडली तर ती भूमिका केलीच पाहिजे, असं पोंक्षे म्हणाले.
पवारांनी विरोध केला नाही, भुजबळ तर पाठिशी होते!
अमोल कोल्हे यांची वैयक्तिक भूमिका आणि कलाकार म्हणून वेगळी भूमिका असेल. त्यांना या विषयावरुन ट्रोल करणं हे योग्य नाही. २० वर्ष मीदेखील या सर्व त्रासाला सामोरे गेलो आहे. मी देखील नथुराम गोडसे यांची भूमिका केली होती. मी नथूराम गोडसेची भूमिका केल्यानंतर पवार साहेबांनी मला विरोध केल्याचं आठवत नाही. त्यांच्या पक्षातील काही लोकांनी मला विरोध केला होता. मी नथुराम नाटक करत होतो त्यावेळेला मंत्री छगन भुजबळ आमच्या पाठीशी होते, असंही पोंक्षे म्हणाले.
चित्रपटावर बंदी आणणे हा मुर्खपणा
चित्रपट बंद पाडण्याची भूमिका घेणे हा मूर्खपणा आणि वेडेपणा आहे. आम्ही पुरोगामी महाराष्ट्राचे आहोत हा सर्व दुटप्पीपणा आहे. कोणी बोललं म्हणून चित्रपट कलाकृती बंद होत नाही. ज्यांना सिनेमा बघायचाय त्यांनी बघावा, ज्यांना नाही बघायचा त्यांनी बघू नये. कलाकृतीवर बंदी आणण्याच्या मी पुन्हा विरोधात आहे, असंही पोंक्षे म्हणाले.
संबंधित बातम्या