मुंबई: शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सिझनप्रमाणेच आता दुसरा सिझनसुद्धा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरतोय. या सिझनमध्येही एकापेक्षा एक दमदार उद्योजक व्यवसायाच्या अनोख्या कल्पना घेऊन परीक्षकांसमोर येत आहेत. यामध्ये काहीजण असेही असतात, ज्यांच्या बिझनेसमध्ये दम नसतो, तर काहीजण असेही आहेत ज्यांच्यासाठी शार्क्समध्येच भांडणं होऊ लागतात. शार्क टँक इंडियाचे हे परीक्षक त्यांच्या व्यवसायात माहीर आहेतच, पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा उद्योजकाच्या हाती बाजी असते. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये दिल्लीच्या एका स्टार्टअप कंपनीने शार्क टँक इंडियाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ऑफरला नाकारलं. आपल्या कंपनीसाठी गुंतवणूक घेण्यासाठी आलेल्या या पिचरने फक्त 5 कोटी रुपयांची ऑफरच नाकारली नाही तर तो स्वत:च्या इक्विटीवरही अडून बसला होता. मात्र त्याने नाकारलेल्या या मोठ्या ऑफरमागील कारण खूप छोटं असल्याने नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
‘शार्क टँक इंडिया 2’च्या नव्या एपिसोडमध्ये दिल्लीच्या अंकित अग्रवाल यांची एण्ट्री झाली. अंकित यांच्या कंपनीचं नाव अनस्टॉप असं आहे, जी लाखो तरुणांना नोकरीसाठी मदत करते. या कंपनीसाठी अंकित यांनी 1 टक्के इक्विटीच्या बदल्यात एक कोटी रुपयांची मागणी केली. अंकित यांच्या कंपनीची कल्पना ऐकल्यानंतर ‘कार देखो’चे संस्थापक अमित जैन यांनी लगेच 10 टक्के इक्विटीच्या बदल्यात 5 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली. मात्र अंकित यांना ही ऑफर आवडली नाही. विशेष म्हणजे अंकित यांनी या ऑफरला नकार देण्यामागचं खरं कारण इक्विटी नाही तर काहीतरी वेगळंच आहे.
अंकित अग्रवाल यांना त्यांच्या कंपनीसाठी चारही शार्क्स म्हणजेच अनुपम मित्तल, नमिता थापर, अमन गुप्ता आणि अमित जैन हवे होते. अंकित यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की त्यांना सर्व शार्क्सकडून फंडिंग हवी आहे. अंकित यांनी गेल्या वर्षी (2021-22) 16 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर या वर्षी कंपनीचं टारगेट हे 30 ते 35 कोटी रुपये इतकं आहे.
अंकित यांना अमित जैन यांनी जेव्हा ऑफर दिली, तेव्हा त्यांनी साफ नकार दिला. मात्र नंतर जेव्हा शार्क्सना पिचरची ‘मन की बात’ समजली, तेव्हा ते सर्वजण एकत्र आले. बऱ्याच चर्चेनंतर अखेर 4 टक्के इक्विटीच्या बदल्यात 2 कोटी रुपयांची ऑफर अंकित यांच्या कंपनीला मिळाली.