अभिनेत्री करीना कपूर आणि तिची सासू शर्मिला टागोर यांच्यातील नातं कसं आहे, हे विविध मुलाखतींमधून अनेकदा स्पष्ट झालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला या करीनाच्या एका चित्रपटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेल्या करीनाच्या या चित्रपटाला शर्मिला यांनी थेट ‘मूर्खपणा’ असं म्हटलंय. त्याचसोबत त्यांनी त्या चित्रपटाविषयी आपलं स्पष्ट मत मांडलंय. करीनाचा हा चित्रपट दुसरा-तिसरा कोणता नसून मार्च महिन्यात प्रदर्शित झालेला ‘क्रू’ हा आहे. या चित्रपटाच्या कथेत काहीच दम नव्हता, असं शर्मिला टागोर म्हणाल्या.
युट्यूब चॅनल ‘दिल से कपिल सिब्बल’ला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला टागोर या आताच्या चित्रपटांविषयी आणि त्यात दाखवल्या जाणाऱ्या महिलांविषयी बोलत होत्या. यावेळी त्यांनी सून करीनाच्या ‘क्रू’ या चित्रपटाचंच उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या, “अर्थात चित्रपटाच्या कथेत बिनडोकपणा होता. सर्वकाही विश्वास ठेवण्यापलीकडचं होतं. पण तीन महिलांनी ही उत्कंठा वाढविणारी कथा सादर केली. एक विमानाचं लँडिंग करतेय, एक तिजोरी फोडतेय.. या सर्व गोष्टी एकत्र करणं आणि त्या तिघींमधील ताळमेळ खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं गेलं. एक महिलाच दुसऱ्या महिलेची मोठी शत्रू असते, असं म्हटलं जातं. पण इथे ते खरं नाहीये.”
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने ‘क्रू’च्या यशावर तिचं मत मांडलं होतं. “महिलासुद्धा बॉक्स ऑफिसचे नियम मोडू शकतात, हे या चित्रपटाने सिद्ध केलंय. चित्रपट हे मनोरंजनाचं एक माध्यम आहे आणि क्रू चित्रपटात मनोरंजनासोबतच एक संदेशसुद्धा दिला आहे. तीन महिलांनी या चित्रपटाचं यश मिळवलंय. आमच्या चित्रपटाने 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. त्यामुळे आजच्या काळात स्त्री-पुरुष यांच्यात काही फरक नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आम्ही हे जुने समज मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं करीना म्हणाली होती.
राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘क्रू’ हा चित्रपट 29 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये करीना कपूरसोबत तब्बू आणि क्रिती सनॉन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीत या तिघी एअर हॉस्टेस म्हणून काम करत असतात. अशा वेळी आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्या तिघी कशा पद्धतीने सोन्याची चोरी करतात, याची कथा विनोदी पद्धतीने या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने देशभरात 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.