अभिनेता शशांक केतकरच्या एका पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. फिल्मसिटीजवळ असलेल्या रस्त्यावरील कचरा दाखवत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘काठावरचा इंजीनिअर.. ही अवस्था टाऊन प्लॅनिंग करणाऱ्यांची आहे, आपल्या शहरातला कचरा मॅनेज करणाऱ्यांची आहे’, असं म्हणत त्याने प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला आहे. फिल्मसिटीजवळच्या रस्त्यावरील घाण आणि कचरा दाखवत त्याने नागरिकांसह प्रशासनालाही हा सवाल केला आहे. शशांकने त्याच्या या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगरपालिकेलाही टॅग केलंय.
‘मेरा भारत महान. मोदीजी असोत, राहुलजी असोत किंवा माझ्यासारखी सामान्य जनता असो, हे चित्र भारतात कुठेच अपेक्षित नाहीये. मुंबईची फिल्मसिटी बघायला भारतातून, जगभरातून लोक येतात, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा इतका सुंदर परिसर असावा ही कल्पना कोणाची? ही अवस्था, हे चित्र काही आजचं नाहीये. मी गेल्या दहा वर्षांत ती जागा कधीच स्वच्छ पाहिली नाहीये. इतकी उदासीनता का? हा सगळा कचरा उचलून बीएमसी ऑफिससमोर ओतला तर आवडेल? येणारे पर्यटक, कलाकार आणि तिथे राहणारे नागरिक, सगळ्यांच्या माथी हा असला घाणेरडा परिसर का मारला आहे,’ असा संतप्त सवाल शशांकने या पोस्टद्वारे केला आहे.
शशांकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह विविध कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘खरंय शशांक, आपण राजकीय मतमतांतरांमध्ये इतके गुंतलोय की आपण ही गोष्ट नेहमी विसरतो, ही सर्वप्रथम आपली जबाबदारी आहे. इतरांच्या जबाबदाऱ्यांवर निबंध लिहितील पण स्वता:ची जबाबदारी बजावण्याची वेळ येते तेव्हा कारणांची यादी येते. मला असं वाटतं की आपल्या सर्वांनाच कचऱ्यात राहायला आवडतं’, अशी कमेंट अभिनेत्री अभिज्ञा भावेनं केली. त्यावर उत्तर देताना शशांकने लिहिलं, ‘कोडगे झालोय आपण आणि हेच एनकॅश केलं जातं.’ तर शरद पोंक्षे म्हणाले, ‘मित्रा.. खूप तळमळीनं बोलतोयस. हे साफ करण्याची जबाबदारी ज्यांची आहे, त्यांच्यावर कार्यवाही व्हायला हवी.’