होणार सून मी या घरची, पाहिले ना मी तुला, स्वप्नांच्या पलिकडले आणि आता मुरांबा अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक केतकर हा अभिनयाशिवाय सोशल मीडियावरील त्याच्या अनेक सामाजिक आणि इतर विषयांवरील व्हिडीओमुळे चर्चेत असतो. याआधी त्याने अनेकदा रस्त्यावरील कचऱ्याबाबत व्हिडीओ केले असून त्याच्या या व्हिडीओमुळे प्रशासनाला दखलही घ्यावी लागली आहे. त्याने तक्रार केलेल्या ठिकाणचा कचरा उचलण्यात आल्याचेही पाहायला मिळाले आहे. अशातच शशांकने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे त्याने सरकार आणि स्थानिक यंत्रणेसमोर थेट सवालही उपस्थित केला आहे.
ही परिस्थिती सुधारणार कधी? शशांकचा थेट यंत्रणेला सवाल
मुंबईतील मालाड पश्चिमधील एके ठिकाणचा व्हिडीओ शेअर करत शशांकने याबद्दलची तक्रार महानगरपालिकेकडे केली आहे. शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याने त्या ठिकाणचा व्हिडीओ शेअर करत “काय करायचं? मी रोज सकाळी घोडबंदर रोडवरुन दीड ते पावणे दोन तास गाडी चालवत येतो आणि जातो. घोडबंदर रोडची अवस्था इतकी घाण आहे की काही विचारू नका आणि आता तो रस्ता बरा की काय इतकी वाईट अवस्था आहे मढ आयलँडच्या रस्त्यांची.
या ठिकाणी किमान ५० तरी शूटिंग सुरू असतील. इतका महसूल निर्माण करणारा हा भाग आहे. पण या भागातील गावकऱ्यांची गैरसोय बघण्यासारखी आहे”. असं म्हणत त्याने मालाडमधील मालवणी पोलिस स्टेशन व मालाड चर्चच्या मधील कचरापेटीचा फोटो आणि व्हिडीओ दाखवला आहे. यापुढे तो म्हणतो की, “या फोटोत दिसणारी कचऱ्याची अवस्था सकाळी नीट असून त्या परिसरातील वस्तीमुळे तिथले दोन-तीन कंटेनर भरुन कचरा बाहेर पडतो आणि तेव्हाची अवस्था अतिशय वाईट असते”.
राज्यमातेला नमस्कार करून राज्यकर्ते मत मागणार का?; निवडणुकांवरून बोचरी टीका
शशांकने निवडणुकांवरूनही निशाणा साधला. पुढे तो म्हणाला की, “मला गंमत याचीच वाटते की आता नेमकी आचारसंहीता आहे. त्यामुळे कुणाबद्दल वाईट बोलायच नाही. पण मी आताच हा व्हिडीओ मुद्दाम पोस्ट करत आहे. कारण एखादी गोष्ट जेव्हा अधिकृत होते तेव्हा त्याकडे अधिक लक्ष द्यावं लागतं आणि मी बोलत आहे ते राज्यमातेबद्दल म्हणजेच गोमातेबद्दल.
गायीला आपण राज्यमातेचा दर्जा दिला आहे. ती या कचऱ्याच्या आजूबाजूला बसून आपलं पोट भरते आहे. ही आत्ताची अवस्था नाही, कारण मी या परिसरात राहत नाही. मी तिथून दीड-दोन तास लांब ठाण्याला राहतो. पण मी तिथे राहत नसलो तरी मी या देशात राहतो. त्यामुळे या परिसराची मला काळजी वाटते. मला तिथल्या लोकांचीही काळजी वाटते. इतक्या अस्वच्छ घाणेरड्या परिसरात सगळी मंडळी दुर्दैवाने राहत आहेत. ज्या राज्यमातेला नमस्कार करून सगळे राज्यकर्ते मत मागणार आहेत आणि ज्यांच्याकडे मत मागणार आहेत, ते कोणत्या अवस्थेत राहत आहेत हे बघा”
कचरा साफ होईपर्यंत फोटो पोस्ट करेन; शशांकचा राग अनावर
शशांकने स्पष्टपणे त्याचं मत मांडले आहे. “मी माझ्याकडून प्रामाणिक प्रयत्न करत असून अशा परिस्थितीबद्दल भाष्य करत आहे. माझ्यातील आशा अजूनही जीवंत आहे. त्यामुळे मी महानगरपालिकेच्या नजरेस आणून देत आहे आणि मी हा कचरा साफ होईपर्यंत माझ्या इन्स्टाग्रामवर याचे फोटो पोस्ट करेन.
यानंतर माझ्याच इंडस्ट्रीतली लोक आणि काही प्रेक्षक मला टोमणे मारतील. किंवा नाव ठेवतील. तुला काय करायचं आहे, कचरा असूदेत, खड्डे असूदेत, माणसं मरुदेत. तुला काय करायचं आहे असं म्हणतील. पण आपल्याला पोलिस, देव आणि सरकारच्या भीतीमधून बाहेर पडलं पाहिजे. अनेकजण मला पाठींबाही देतील पण भीतीपोटी कुणीही खुलेआम याबद्दल बोलणार नाही. पण मला हे करायचं आहे, कारण ही माझी जबाबदारी आहे”. असं म्हणतं त्याने ही हाती घेतलेली मोहीम कायम सुरु ठेवणार असल्याचं सांगितले आहे.
सरकार बदललं की सगळं बदलेल फालतू पर्याय, शशांकचा राग अनावर
हा व्हिडीओ शेअर करताना शशाकने कॅप्शनमध्ये असं लिहिले आहे की, “सरकार कोणतेही असो… आपली आणि आपल्या देशाची अवस्था कधी सुधारणार? ही जबाबदारी नेमकी कोणाची? इतका निर्लज्जपणा येतो कुठून? सरकार बदललं की सगळं बदलेल वगैरे फालतू पर्याय सुचवू नका. गेली अनेक वर्ष आपला देश अस्वच्छ देशांच्या यादीत अग्रेसरच आहे. त्यामुळे या आधीच्या अनेक सरकारांनीसुद्धा काही आपल्याकडे, या प्रश्नाकडे, सपशेल दुर्लक्षच केलं आहे. काहीतरी कायमस्वरूपी उपाय हवा आहे देशाला माझा हा राग, संताप… हा या अवस्थेबद्दल आहे… कोणा एका व्यक्ती किंवा पक्षाबद्दल नाही”.
दरम्यान शशांकच्या या व्हिडीओवर आणि त्याने मांडलेल्या या मुद्द्यांवर अनेकांनी त्याला पाठिंबा देत प्रतिक्रिया दिली आहे. शशांकच्या या व्हिडीओनंतर खरचं याची दखल घेतली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.